स्त्रीची विविध रूपे उलगडत झाले ‘नृत्यार्पण’

स्त्रीची विविध रूपे उलगडत झाले ‘नृत्यार्पण’

मएसो बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त पं. मनीषा साठे यांचे सादरीकरण

पुणे : कथकमधील नजाकत, शास्त्रशुद्धता घेऊन नाट्यसंगीत, पोवाडा, भाव छटा अशा अभिनव नृत्यप्रयोगाचा भारावून टाकणारा कलाविष्कार पुणेकरांनी अनुभवला. निमित्त होते पं. मनीषा साठे यांच्या ‘नृत्यार्पण’ या कार्यक्रमाचे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भांडारकर रस्त्यावरील बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या माजी विद्यार्थिनी व प्रसिद्ध कथक नृत्यांगना मनीषा साठे यांच्या नृत्याचा ‘नृत्यार्पण’ हा विशेष कार्यक्रम यावेळी सादर झाला. शाळेच्या विकास कामाकरिता निधी उभारण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंडिता मनीषा साठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ उद्योजक अरूण फिरोदिया, डॉ. जयश्री फिरोदिया हे प्रमुख पाहुणे होते. तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी विद्यार्थी एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळ अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, आजीव मंडळ, नियामक मंडळ सदस्य, शाला समिती अध्यक्षा आनंदी पाटील, महामात्र सुधीर भोसले, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका रोहिणी फाळके, मनीषा साठे यांची सून तेजस्विनी साठे आदी उपस्थित होते.

यावेळी त्रिदेवी स्तवन करत साठे यांनी नृत्याविष्कार प्रारंभ केला. महाकाली, सरस्वती, लक्ष्मी या त्रिदेवींचे वर्णन लोभस नृत्यातून त्यांनी पेश केले. याला डॉ. चैतन्य कुंटे यांनी संगीत दिले असून, डॉ अनुराधा कुबेर यांचे गायन होते. त्यानंतर शुद्ध कथकचे प्रदर्शन आडा चौतालात करण्यात आले.

यानंतर एक अभिनव प्रयोग रसिकांची विशेष दाद मिळवून गेला. संगीत शाकुंतल, संगीत गोरा कुंभार, संगीत भावबंध व संगीत पाणी ग्रहण या संगीत नाटकांतील निवडक रचनांवर कथक नृत्य सादर करत अनोखा ठेहराव प्रेक्षकांनी अनुभवला. असाच अजून एक वेगळा नृत्याविष्कार म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी गायलेला राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील पोवाड्यावर कथक नृत्याविष्कार येथे सादर करण्यात आला. राधेच्या कृष्ण रूपातील विविध भाव साठे यांनी पेश केले. कार्यक्रमाचा समारोप जोशपूर्ण तांडव नृत्याने झाला.

यात नंदिनी कुलकर्णी, सहिष्णुता राजाध्यक्ष, सर्वेश्वरी साठे, सायली वैद्य, मौसमी जाजू, आलापी जोग, मिथिला भिडे, कीर्ती कुरंडे, वल्लरी आपटे, वैष्णवी निंबाळकर, मधुरा आफळे, चैत्राली उलुरकर, कल्याणी सासवडकर, आयुशी डोबरिया, रेवती देशपांडे नृत्यांगना सहभागी झाल्या होत्या. पूनम गांधी, ज्योती ब्रह्मे व शाळेच्या शिक्षिका मंजुश्री गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *