चिपळूण: दरवर्षी चिपळूणमध्ये पुराचं पाणी शिरतं शहरातल्या शंकरवाडी येथील ज्या भागातून वाशिष्टीतून पाणी शहरात शिरतं त्या भागात नलावडे बंधारा बांधण्याचा शुभारंभ सोमवारी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडला. बहादूर शेख कडून पुढे येणाऱ्या जलप्रवाहातून पुराचे पाणी याच भागातून शहरात शिरते. इथे असलेला इंग्रज कालीन बंधारा २००५ साली तुटला होता. चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनानंतर आमदार शेखर निकम यांनी या बंधाऱ्यासाठी शासनाकडे मागणी केली. तब्बल वीस कोटी रुपये या बंधारासाठी मंजूर झालेत. या बंधाऱ्यामुळे शहरात शिरणारा पुराचे पाणी वाशिष्ठीच्या पात्रातून पुढे जाणार आहे. २८५ मीटर लांब असलेला हा बंधारा ग्रॅव्हिटी बेसवर बांधण्यात येतोय. यामुळे कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि पुराच्या पाण्यापासून संरक्षण होणार आहे.
काम दर्जेदार व्हावं यासाठी
या कामावर चिपळूण बचाव समिती विशेष लक्ष देणार आहे, अशी माहिती मिळते.
बंधाऱ्याच्या कामासोबत गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ देखील आज करण्यात आला. यावेळी जलसंपदा विभागाच्या वतीने दोन पोकलेन आणि पाच हायवा डंपर या मशिनरीच्या साह्याने गाळ काढण्याचे काम सुरू झाले. या शुभारंभ प्रसंगी जलसंपदा विभागाचे अभियंता सलगर साहेब, विपुल खोत, आमदार शेखर निकम यांच्या समवेत पूजा निकम, माजी नगरसेवक विजय चितळे, शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ, चिपळूण बचाव समितीचे राजेश वाजे, अरुण शेठ भोजने, उदय ओतारी, महेंद्र कासेकर, शहानवाज शहा आणि अनेक लोकप्रतिनिधी मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. बंधाऱ्यासोबत गाळ काढण्याचे काम सुरू झाल्यामुळे चिपळूणमध्ये समाधान व्यक्त होत आहे.