बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता; डॉ. सुनीता कराड यांची पत्रकार परिषदेत माहिती
१२ सप्टेंबरला होणार प्रवेश परीक्षा; १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मदत
पुणे : देशातील एक उत्कृष्ट खासगी विद्यापीठ असलेल्या एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये (MIT ADT University) विधी अभ्यासक्रम सुरु करण्यास बार कौन्सिल ऑफ इंडियाने (Bar Council of India) मान्यता दिली आहे. विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश तु. कराड (Mangesh Karad) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एमआयटी’च्या स्कुल ऑफ लॉ मध्ये यंदापासून विधी (कायदा) क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. इच्छूक विद्यार्थ्यांना १० सप्टेंबर २०२३ पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. सुनीता कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘स्कुल ऑफ लॉ’च्या अधिष्ठाता प्रा. डॉ. सपना देव, कुलगुरूंचे सल्लागार शिवशरण माळी, ऍड. सुकृत देव आदी उपस्थित होते.
डॉ. सुनीता कराड म्हणाल्या, “पाच वर्षांचा बीबीए-एलएलबी (BBA-LLB), तीन वर्षांचा एलएलबी (LLB) हे दोन पदवी, तर दोन वर्षांचा एलएलएम (LLM)हा पदव्युत्तर आणि एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स इन लीगल जर्नालिझम (PG Certificate Course in Legal Journalism) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहेत. प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० सप्टेंबर २०२३ अशी असून, १२ सप्टेंबर २०२३ रोजी यासाठी प्रवेश परीक्षा होणार आहे. १५ सप्टेंबर २०२३ रोजी निकाल घोषित होऊन प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या परिसरात हे अभ्यासक्रम असणार आहेत. एलएलएम पदवीमध्ये अल्टर्नेटीव्ह डिस्प्युट रिझोल्युशन, इंटेलेक्च्युल प्रॉपर्टी राईट्स, सायबर लॉ, फॅमिली लॉ आदी विषयात स्पेशलायझेशन करता येणार आहे. व्यवसाय प्रशासन आणि कायदेशीर अभ्यास यांचे अनोखे व समृद्ध मिश्रण असलेला बीबीए-एलएलबी हा अभ्यासक्रम सुरु होत आहे. उच्च दर्जाच्या सोयीसुविधा, नवोपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य असलेल्या या संस्थेत तुम्हाला शिकण्याची संधी आहे. पाठ्यक्रमासह अवांतर व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक उपक्रमांत सहभागी होण्याची संधी तुम्हाला आहे. उद्योगांना भेटी, चर्चासत्र, वादविवाद, व्यवसाय क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक प्रगतीसाठी ही पाच वर्षे महत्वाची ठरतील. आपल्या समवयस्कांच्या साथीने येणाऱ्या प्रत्येक आव्हानांवर मात करून उत्कृष्ट मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या करिअरसाठी ही पाच वर्षे महत्वाची असणार आहेत.”
प्रा. डॉ. सपना देव म्हणाल्या, “वकिली किंवा कायदा हा एक उदात्त व्यवसाय आहे, जो समाजाला आकार देण्यासाठी, न्यायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वैयक्तिक हक्कांचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. कायद्याचा अभ्यास करणे म्हणजे केवळ कायदे आणि प्रकरणे लक्षात ठेवणे नव्हे, तर ते गंभीर विचार, विश्लेषणात्मक कौशल्ये आणि जटिल समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे देखील आहे. कायद्याचे शिक्षण तुमच्यासाठी संधींचे जग उघडेल. स्कुल ऑफ लॉ मध्ये तुम्हाला क्रिमिनल, कॉर्पोरेट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, पर्यावरण, मानवाधिकार या आणि अशा महत्वपूर्ण विषयात स्पेशलायझेशन घेण्याची संधी आहे. लिटिगेशन, वकिली, कॉर्पोरेट, शिक्षण, सार्वजनिक सेवा अशा विविध क्षेत्रात नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. कायद्याचे शिक्षण केवळ करिअरसाठीच नाही, तर समाजावर सकारात्मक परिणाम होण्यासाठी महत्वाचे आहे.”
शिवशरण माळी म्हणाले, “एमआयटीमध्ये विधी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता मिळाल्याचा आनंद आहे. लोकशाही देशात कायद्याचे राज्य चालवण्यासाठी कायद्याचे शिक्षण समाजाचा आत्मा आहे. स्कुल ऑफ लॉ मध्ये चांगला कायदे अभ्यासक घडण्यासाठी पाठ्यक्रमासह मूट कोर्ट स्पर्धा, इंटर्नशिप, संशोधन प्रकल्प, मोफत कायदेशीर मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवले जातील. यासह स्कुल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिक व भावनिक दृष्ट्या सक्षम बनवण्यावर, तसेच चारित्र्यसंपन्न व समृद्ध जीवनासाठी मूल्ये, संस्कार रुजविण्यावर भर दिला जाणार आहे. वैश्विक बंधुत्वाची भावना, समाजाच्या व देशाच्या शाश्वत विकासासाठी, पर्यावरण व मानवतेच्या रक्षणासाठी योगदान देणारा युवक घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
प्रवेश परीक्षा आणि मुलाखत झाल्यानंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश निश्चित होणार आहे. प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या www. mituniversity.ac.in या वेबसाईटला भेट द्यावी किंवा ७०१४०४६४१६ किंवा ७३९१०९५१९३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. डॉ. सपना देव यांनी केले.