पुणे : विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा येत्या रविवारी (दि. ३ ऑक्टोबर) आयोजिला आहे. माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत फर्ग्युसन रस्त्यावरील समितीच्या आपटे वसतिगृहात हा मेळावा होत आहे. समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, असे संयोजिका पुष्पा आरोटे व सुजाता कोळेकर यांनी सांगितले.
ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या गरीब व हुशार विद्यार्थ्यांची अल्पदरात भोजन व निवासाची सोय व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, या उद्देशाने विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे ही संस्था काम करते. येथून बाहेर पडलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा संस्थेत योगदान द्यावे, संस्थेशी संलग्नित राहून आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, या निमित्ताने असे मेळावे उपयुक्त ठरतात. तसेच माजी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुकही यावेळी करण्यात येते. समितीत येणे हे आम्हा मुलींसाठी माहेरी आल्यासारखे आहे. जास्तीत जास्त माजी विद्यार्थिनी या मेळाव्याला याव्यात, यासाठी अलकनंदा पाटील, सुनीता पाटील, मनीषा गोसावी, रेवती गटकळ, वैशाली दगडे मेहनत घेत आहेत, असे पुष्पा आरोटे यांनी नमुद केले.