म. ए. सो. बालशिक्षण मंदिर शाळेत  मुलांचा पहिला दिवस ठरला संस्मरणीय

म. ए. सो. बालशिक्षण मंदिर शाळेत मुलांचा पहिला दिवस ठरला संस्मरणीय

पुणे : सनईचे सूर, ढोल ताशांचा निनाद, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, मंगल तोरणे, ठिकठिकाणी विविध प्राण्यांच्या कार्टूनचे कट आऊट्स अशा मंगलमय आणि आनंदी वातावरणात मुलांचे औक्षण करून म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर शाळा, डेक्कन जिमखाना येथील शिक्षिकांनी चिमुकल्यांचा शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय केला.
चिमुकल्यांचा किलबिलाट, नवीन दप्तर, नवीन गणवेश, नवीन पाण्याची बाटली, डबा अशा सर्व नवीन वस्तूंच्या कौतुका बरोबर आता नवीन मित्र मैत्रिणी मिळणार, नवीन शाळा, नवीन शिक्षक या सगळ्यांचेच कुतूहल मुलांच्या डोळ्यात साठून आले होते. एकीकडे पालकांना सोडून, एवढ्या दिवसांच्या सुट्टी नंतर शाळेत जाणारे डोळे पाणावले होते तर दुसरीकडे शाळेकडून कौतुक करून घेण्यासाठी लहानग्यांची पाऊले अगदी शिस्तीत पुढे सरकत होती. आपापल्या पाल्याला शाळेच्या गेट मधूनच ‘बाय’ करताना पालक उत्सुक होते तर काय काय नवीन दिसते याकडे मुलांचे डोळे लागलेले. त्यामुळे मुलांना नावाने आवाज देत होणाऱ्या एकच गोंधळाला मात्र सनईचे सूर आणि ढोल ताशांचा निनाद छेदून थेट सर्वांच्याच हृदयाला भिडत होते यात शंका नाही. 
या जंगी स्वागताविषयी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण म्हणाल्या, “शाळेचे यंदा शंभरावे वर्ष साजरे केले जात आहे. या शतक महोत्सवी वर्षातील शाळा प्रवेशाचा हा मंगलमय दिवस होता. उन्हाळी सुट्टी संपवून मुले शाळेत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा हा दिवस असाच मांगल्यपूर्ण संस्मरणीय व्हावा अशी आमची इच्छा होती. व त्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली. विद्यार्थी आपापल्या वर्गात गेल्यावरही गाणी, गोष्टी, खेळ अशा विविधरित्या त्यांचा आजचा हा दिवस रंजक करण्यात आला.”
शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील तसेच शाला समितीचे नवनियुक्त महामाञ डाॅ. अंकुर पटवर्धन आदी मान्यवरांनी शाळेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *