आजच्या द्वेषाच्या वातावरणात कबीरच आपला तारक

आजच्या द्वेषाच्या वातावरणात कबीरच आपला तारक

भारत सासणे यांचे मत; विश्वपारखी प्रबुद्ध महाकवी ‘संत कबीर वाणी’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : “आज भवतालचे वातावरण बघताना कबीर आपल्याला आवश्यक आहेत. कबीर सर्व धर्माच्या पलीकडे आहे, माणूस जाणतो आणि प्रेमाची भाषा बोलतो. हीच प्रेमाची भाषा आज आपल्याला तारक ठरणार आहे. त्यामुळे या द्वेषाच्या वातावरणात कबीरच आपला तारक ठरू शकतो,” असे मत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले. 
 
आर. के. सोनग्रा प्रकाशन, महाग्रंथ प्रकाशन उत्सव यांच्याद्वारे आचार्य रतनलाल सोनग्रा अनुवादित विश्वपारखी प्रबुद्ध महाकवी संत कबीर वाणी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन भारत सासणे यांच्या हस्ते झाले. पत्रकारभवन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव प्रसाद अबनावे व ज्येष्ठ लेखक दीपक चैतन्य, सोनग्रा प्रकाशनच्या प्रकाशक आरती सोनग्रा उपस्थित होत्या.
 
भारत सासणे म्हणाले, “सध्या बाहेरच्या वातावरणात द्वेषभावना पसरत असून, नकळत आपल्यातही ती येत आहे. त्याचे विषात रुपांतर होत आहे. या विषाचा उतारा म्हणजे संत कबीरांची ही प्रेमाची वाणी, सर्व धर्मांपलीकडचा माणुसकीचा विचार आहे. सोनग्रा यांनी केलेले कार्य फार मोठे व महत्वाचे असून योग्यवेळी ते समाजासमोर येत आहे. कबीर अनेकांचे प्रेरणास्थान आहे. विविध स्वरूपात कबीर सतत आपल्या भोवती आहेच; फक्त कबीरांचे विचार अंमलात आणणे आवश्यक आहे. कबीरांची वाणी ओघवती आहे. त्यामुळे त्यांची पदे मराठीतही तेवढ्याच चपखलपणे आणणे ही मोठी गोष्ट आहे. त्यासाठी सोनग्रा यांना धन्यवाद द्यायला हवेत.” 
 
रतनलाल सोनग्रा म्हणाले, “संतांनी जातीभेद नष्ट करायला सांगितले आणि प्रत्येक जातीने आपापला संत वाटून घेतला. कबीर कोणत्याही एका जातीचे नसल्याने त्यांची जयंती कोणीच साजरी करत नाही. कबीर अभ्यासताना लोकांमध्ये मला मिळालेला कबीर अधिक महत्वाचा वाटतो. कबीर समग्र मानवतेचा महाकवी आहे. त्याची आजच्या काळात फार मोठी आवश्यकता आहे. त्यांनी प्रेमाचा संदेश दिला. दुष्ट रुढींवर प्रहार केला. त्यामुळे हे काम मला महत्वाचे वाटते. लोकांच्या हिताचे काम केले की आपलेही आयुष्य आपोआप वाढते.”
दीपक चैतन्य म्हणाले, “जनसाहित्य मराठीतून हिंदीत नेण्याचे महत्वपूर्ण काम सोनग्रा यांनी केले आहे. तसेच हिंदीतील उत्तम साहित्य मराठीत आणले आहे. कबीर वाणीचा हा ग्रंथ त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या चिंतनातून, अनुभवातून अनुवादित केला आहे. हा ग्रंथ म्हणजे केवळ शाब्दिक अनुवाद नसून भावानुवाद आहे. त्यांचे हिंदी, मराठी, इंग्रजी आणि राजस्थानी अशा विविध भाषावार प्रभूत्व आहे. या सर्व भाषांतील साहित्याचा सेतू बांधण्याचे काम त्यांनी केले आहे.” 
 
रतनलाल सोनग्रा यांच्या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीबद्दल शुभेच्छा देत प्रसाद आबनावे यांनी सोनग्रा यांनी अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ समाजासमोर आणल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. व या उपक्रमात आपल्याला सहभागी होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आरती सोनग्रा यांनी मनोगत व्यक्त करत आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *