पुणे : कुटुंबातील प्रत्येकाच्या सर्जनशीलतेला, बुद्धीला चालना व प्रोत्साहन देण्यासाठी ‘वर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.०’ या प्रदर्शनाचे लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे आणि स्मार्ट चॅम्प्स पुणेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २९ एप्रिल ते १ मे दरम्यान दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले असणार असल्याची माहिती लोक बिरादरी मित्र मंडळ ट्रस्टच्या विश्वस्त ऐश्वर्या चपळगावकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा शिल्पा तांबे, सदस्य अमेय देशपांडे, सोलारीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश भानुशाली, स्मार्ट चॅम्प्स पुणेचे रविंद्र नाईक आदि उपस्थित होते.
प्रदर्शनाविषयी त्या म्हणाल्या, “या प्रदर्शनाचे हे तिसरे पुष्प आहे. हे प्रदर्शन वय वर्ष ३ ते ९९ या वयोगटासाठी आहे. येथे तीन दिवस आपल्याला एक बौद्धिक सहल घडणार आहे. यातून प्रेक्षकांना विविध कोडी आणि बोर्ड गेम्सचे आकर्षक नमुने अनुभवायला मिळतील. शाब्दिक, गणिती, खेळ, बौद्धिक क्रीडाप्रकार एकल व समूह स्वरूपात असणार आहेत.”
अशाच प्रकारच्या ‘पझल’ प्रयोगशाळा गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणार्या तीन शाळांमध्ये आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी संगितले. याद्वारे पुण्याच्या मुलांना आदिवासी मुलांशी जोडण्याचा आणि आदिवासी मुलांनाही अशा प्रकारचे अभिनव बौद्धिक प्रेरणा देणारे उपक्रम शिकायला मिळतील, हा त्यामागील उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या. यातून निर्माण होणार निधी या आदिवासी मुलांच्या शाळेसाठी वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी ऐश्वर्या – ७८७५५७१६७९, अमेय – ८००७७७५३८५, रवींद्र नाईक – ७७९८१५६६५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.