मूलभूत गोष्टींना ग्लॅमर नसले, तरी त्या चिरंतन असतात : देवेंद्र फडणवीस

मूलभूत गोष्टींना ग्लॅमर नसले, तरी त्या चिरंतन असतात : देवेंद्र फडणवीस

कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन; पं. शौनक अभिषेकी यांना संस्कृती कलागौरव पुरस्कार प्रदान

पुणे : “शास्त्रीय संगीत मूलभूत आहे. त्याला फार ग्लॅमर नसले, तरी ते टिकणारे आहे. शास्त्रीय संगीताला बैठक, अनोखा बाज आणि मधुरता आहे. अभिषेकी घराण्याने शास्त्रीय संगीताची केलेली सेवा अतुलनीय आहे. शास्त्रीय संगीत साधकानी आश्वस्त राहून आपली नियमित सेवा सादर केली पाहिजे,” असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १२ व्या ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यंदाचा ‘संस्कृती कलागौरव पुरस्कार २०२२’ पं. शौनक अभिषेकी यांना प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. याबरोबरच यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याचा बजरंगबलीची मूर्ती, सन्मानचिन्ह व रोख रक्कम ५१ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. मोहोळ यांचा मित्र परिवार आणि पत्नी मोनिका यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या मोहोळ यांच्या कारकिर्दीवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. मिलिंद रथकंठीवार यांनी याचे संपादन केले आहे.

यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, मोनिका मोहोळ, माजी आमदार योगेश टिळेकर, गायक संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, लेखक अभिनेते डॉ. निलेश साबळे, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर, गोखले कंस्ट्रक्शन्सचे विशाल गोखले, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.चे सुशील जाधव, रांजेकर बिल्डर्सचे अनिरुद्ध रांजेकर, शिरीष देशपांडे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी पुनीत बालन ग्रुप, बढेकर ग्रुप, गोखले कंस्ट्रक्शन्स, रावेतकर बिल्डर्स, रांजेकर बिल्डर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि., बुलढाणा अर्बन बँक लि., सुहाना मसाले, पी.एन.जी. ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोथरूड सांस्कृतिक महोत्सव पुण्याच्या लौकिकात भर घालणारा आहे. सलग बारा वर्षे उदंड प्रतिसादात होणारा हा महोत्सव निखळ मनोरंजन आणि गायन मैफलींची अनुभूती देणारा आहे. मुरलीधर मोहोळ यांनी महापौर म्हणून केलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोविडच्या संकटानंतर हा महोत्सव मोठ्या दिमाखात होतोय, हे पाहताना आनंद वाटतो. खरोखर कोविड संपला याची अनुभूती देणारा हा महोत्सव असून, दिग्गज मंडळी या महोत्सवात येतात, कला सादर करतात, सन्मान होतो. पुणेकरांची सांस्कृतिक भूक मोठी आहे. पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरीचा सन्मान मिळवला याचा आनंद आहे. त्याचा सन्मान करताना त्याचे कौतुक वाटते.”

अभिषेकी म्हणाले की, “या पुरस्काराचा मी नम्रपणे स्वीकार करतो. कोथरूड, कर्वेनगरवासियांनी खूप प्रेम दिले आहे व महापौर मोहोळ यांनी कोविड काळात एवढे मोठे काम केले आहे की, त्यांच्याबद्दल असलेल्या आदरापोटी या पुरस्काराचा विनम्रपणे स्वीकार करत आहे. हा घरचा पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद होत आहे. मी केवळ शास्त्रीय संगीताचा साधक आहे. वडीलांच्या उष्ट्यावर मी जागतो, त्यांची, गुरूंची कृपा माझ्यावर खूप आहे त्यामुळेच आज मी काहीतरी करू शकतो आहे. शास्त्रीय संगीताचा साधक कोणत्याही अपेक्षेने साधना करत नाही. मला जे संगीताचा प्रचार, प्रसाराचे काम करायचे आहे त्यासाठी हे पुरस्कार प्रोत्साहन देतात. “

“पुणे मनपाने मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड काळात खूप सक्षमपणे काम केल्याने परिस्थिती सांभाळली गेली,” असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

मुरलीधर मोहोळ प्रास्ताविकात म्हणाले, “महोत्सवाचे यंदा बारावे वर्ष आहे. या महोत्सवाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद आनंद देणारा आहे. ज्येष्ठ कलाकाराचा, कुस्तीपटूचा गौरव देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याची संधी या माध्यमातून मिळाली. सांस्कृतिक महोत्सवाच्या तपपूर्तीचे समाधान आहे.” योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध प्रसिद्ध विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’च्या विशेष भागाने हास्याच्या मैफलीने रंगला. यावेळी स्वप्नील जोशी, निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सारंग कारंडे, भारत गणेशपुरे व अन्य कलाकार सहभागी झाले होते. देवमाणूस २ मधील कलाकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *