‘युनो’च्या घोषणेनुसार जगभर ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी/जनजाती किंवा मूलनिवासी दिन म्हणून साजरा होत आहे. प्रत्यक्षात मात्र, याच दिवशी गोऱ्या युरोपियन वसाहतवाद्यांकडून मूलनिवासींचा संहार सुरु झाला होता. त्यामुळे हा दिवस मूलनिवासी किंवा आदिवासींचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याऐवजी त्यांना श्रद्धांजली वाहणे अधिक महत्वाचे आहे. तसेच भारतीय आदिवासींना आदरणीय असलेल्या बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा व्हायला हवा.
– युवराज लांडे, सामाजिक कार्यकर्ते

भारतात हा दिवस साजरा होणे आणि त्याला शासकीय स्तरावरून प्रोत्साहन मिळणे हे भारतीयांसाठी दुर्दैवी आहे. कारण भारतीय घटनेद्वारे आदिवासींना अनुसूचित जमाती असे संबोधले जाते आणि या बांधवांना १९५१ सालीच सर्व अधिकार बहाल केले आहेत. भारतातील आदिवासींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला नाही किंवा आजवर स्वतंत्र भारताच्या इतिहासात आदिवासाना संसदीय प्रक्रियेत सुरुवातीपासूनच सामावून घेतले गेले आहे. आदिवासी दिनाच्या आडून काही बाह्यशक्ती धार्मिक, सामाजिक फूट पाडून आदिवासी समाजाला आणि युवकांना भडकवण्याचे प्रयत्न करत आहेत. जनजाती क्षेत्रात फुटिरवादी कारवायाना बळ देऊन या देशापासून वेगळे निघण्याची मागणी करायची, हा या मिशनरी शक्तीचा डाव आहे, हे तथ्य लक्षात घ्यायला हवे. युनोच्या मूलनिवासी स्थायी संघात १४ सदस्य असून, त्यात आजवर एकही भारतीय घेतलेला नाही. याच गोऱ्या मंडळींनी मूलनिवासी दिनाच्या निमित्ताने भारतातील पाच आदिवासी बहुल क्षेत्रात फूट पाडण्याचा आणि भलताच अजेंडा राबविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आदिवासी तरुणांनी हा धोका ओळखला पाहिजे.
भारतीय आदिवासींना गौरवशाली परंपरा
भारतातील जनजाती/ आदिवासी समाजाला मोठ्या गौरवशाली परंपरेचा वारसा आहे. अनेक जनजाती क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिले आहे. इंग्रजांच्या विरोधात लढताना बलिदानही दिले आहे. केवळ जनजाती समाजालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला वंदनीय ठरतील अशा या महापुरुषाबद्दल संपूर्ण समाजात एक आदराची भावना आहे. खरेतर या महापुरुषांचे जन्मदिवस वा बलिदान दिवस हेच एका अर्थाने संपूर्ण समाजासाठी गौरवाचे दिवस आहेत आणि त्यादिवशी राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस साजरे व्हावेत.
१५ नोव्हेंबरला साजरा व्हावा आदिवासी दिन
जगभरातील मुलनिवासींसाठी आणि भारतातील अनुसूचित जमाती बांधवासाठीही हा दिवस वा ही तारीख बदलणे आवश्यक आहे. ९ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीनेही महत्व आहे. याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी इंग्रजाना ‘चले जाव’चा नारा दिला होता. त्याला क्रांतिदिन असेही संबोधतात. अशावेळी या दिवसाचे महत्व कमी करण्याच्या उद्देशानेही या गोऱ्या लोकांनी मूलनिवासी दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे. १५ नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आदिवासींचा/जनजाती बांधवांचा राष्ट्रीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जावा.