सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची चितळे बंधू मिठाईवाले उत्पादन केंद्रास औद्योगिक भेट

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची चितळे बंधू मिठाईवाले उत्पादन केंद्रास औद्योगिक भेट

पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच खेड शिवापूर येथील चितळे बंधू मिठाईवाले उत्पादन केंद्राला भेट दिली. औद्योगिक भेटीअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांनी चितळे बंधू उद्योगाची माहिती जाणून घेतली. चितळे ब्रँडचा वारसा समजून घेण्यासाठी एक संवादी सत्र व उत्पादन प्रकल्पाची पाहणी असे या औद्योगिक भेटीचे स्वरूप होते.
 
 
चितळे बंधू मिठाईवालेचे ऑपरेशन्स हेड शशांक जोशी व सहकाऱ्यानी संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरातून विद्यार्थ्यांनी उद्योगाविषयी माहिती घेतली. ब्रँडचा प्रवास, वृद्धी, तत्कालीन संस्थापक मंडळी आणि सध्याच्या व्यवस्थापन सदस्यांची दूरदृष्टी समजून घेतली. चितळे बंधूंच्या चौथ्या पिढीतील इंद्रनील चितळे यांनी त्यांचे अनुभव सांगितले. चितळे समूहाने सातारा जिल्ह्यातील लिंब या छोट्याशा गावात १९३० च्या दशकात छोटा दुग्ध व्यवसाय सुरू केला. दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ विकण्यापासून ते देशविदेशात सर्वाधिक मागणी असणाऱ्या बाकरवडीपर्यंत आणि इतर तयार उत्पादनाची वर्गवारी बनवण्यापर्यंत त्यांनी कसे यश संपादित केले, याबद्दल त्यांनी माहिती दिली.
बाकरवडी उत्पादन कारखाना कार्यक्षमता वाढविण्यासाठी, देशांतर्गत बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही विकला जाणारा दर्जा राखण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाचा वापर याठिकाणी केल्याचे दिसून आले. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापकांनी स्वादिष्ट बाकरवडी आणि मिठाईची चव चाखली. विद्यार्थ्यांसाठी हा एक प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव होता.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे नियोजन करण्यात आले. व्यवस्थापन विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष उद्योग भेट, संवाद आणि उत्सुकता या बाबी महत्वाच्या आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक अनुभव महत्वाचा आहे, असे त्यांनी नमूद केले. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना औद्योगिक शिक्षणाचे प्रशिक्षण देणे महत्वाचे असून, सूर्यदत्त संस्थेमध्ये नेहमीच त्यावर भर दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *