सरिताबेन राठी यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’मध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पुणे : “आपली भारतीय संस्कृती जगभरात महान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले आहे. हा समृद्ध वारसा जपण्यासाठी आपल्याला जबाबदारीने काम करायचे आहे. सामंजस्य, संयम, एकमेकांचा आदर, सामाजिक सौहार्द आणि चांगल्या सवयींचा अंगीकार करून आपल्या देशाला शांतता व समृद्धतेचे केंद्र बनवावे,” असे प्रतिपादन प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या सरिताबेन राठी यांनी केले.
बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. सरिताबेन राठी व इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ‘सूर्यदत्त’च्या वाद्यवृंदाने गायलेल्या गीतांनी आणि संगीतमय वातावरणाने उपस्थितांची मने जिंकली. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी अफगाण स्टुडन्ट असोसिएशन इन इंडियाचे अध्यक्ष वाली रहेमान रहेमानी, ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, प्राचार्या वंदना पांड्ये, किरण राव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, पालक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आपल्याला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करायचे आहे. विश्वगुरू होण्यासाठी एकजुटीने प्रवास करायचा आहे. प्रत्येकाने यामध्ये योगदान देण्याचा संकल्प करावा. परिश्रम, सृजनात्मकता आणि सातत्यपूर्ण शिक्षणाला पर्याय नाही. राष्ट्र सेवा हेच संस्थेचे प्रथम ध्येय आहे. रौप्य महोत्सव साजरा करताना सतत राष्ट्रीय कार्याचा पुरस्कार संस्था करत आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याबरोबरच राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्यात रुजविण्यावर भर दिला जातो.”
वाली रहेमान रहेमानी म्हणाले, “स्वातंत्र्य हा केवळ शब्द नाही, तर तत्वज्ञान आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना विचारा जे पारतंत्र्यात आहेत, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्याचे महत्व कळेल. स्वातंत्र्यातील प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे आणि सन्मान केला पाहिजे. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही येते याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने देशाला पुढे नेण्यासाठी आपले कर्तव्य केले पाहिजे..”
सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या वतीने मार्च पास्ट, तसेच मानवी ध्वज साकारला. स्कुलच्या वाद्यवृंदाने राष्ट्रगीत गायले. ‘तेरी मिट्टी’, ‘भारत हमको जान से प्यारा है’, ‘ऐ वतन’ अशा देशभतीपर गीतांचे सादरीकरण झाले. अकरावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर समूहनृत्य केले. क्षितिज नहार, सानिका जोशी आणि नंदिनी पानसरे या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. लक्ष्मी नायर हिने आभार मानले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ या जोशपूर्ण घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.