जागतिक ‘ईव्ही’ दिवसानिमित्त पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालयात चार्जिंग स्टेशनची स्थापना
पुणे : “इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. ई-वाहनांचा वाढता वापर पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे ‘ईव्ही’साठी आवश्यक सोयीसुविधा, मुबलक चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून द्यायला हवेत. पुणे विद्यार्थी गृहाच्या महाविद्यालयात उभारलेले हे चार्जिंग स्टेशन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल,” असे प्रतिपादन माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी केले.
इलेक्ट्रिक वाहनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ९ सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक ईव्ही दिवस म्हणून साजरा होतो. या जागतिक ईव्ही दिनाच्या निमित्ताने, पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि जी. के. पाटे (वाणी) व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभाग व ऊर्जा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सौर ऊर्जेच्या वापरावर आधारित दुचाकी ईव्ही वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची स्थापना करण्यात आली. या चार्जिंग स्टेशनच्या उद्घाटनावेळी डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये बोलत होते.
प्रसंगी पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे व विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. मंगेश ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही व्यवस्था मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सुनील रेडेकर म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या परिसरात ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापन करणारी पुणे विद्यार्थी गृह संस्था कदाचित पहिलीच असावी. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल. पुणे विद्यार्थी गृह शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यावर सातत्याने भर देत आहे.