गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ विभावरी आपटे-जोशी यांना ‘दीदी पुरस्कार’

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ विभावरी आपटे-जोशी यांना ‘दीदी पुरस्कार’

‘विश्वमोहिनी दीदी’ सांगीतिक मैफल बुधवारी; हृदयनाथ मंगेशकर, राहुल देशपांडे यांचे सादरीकरण

 
पुणे : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल दिला जाणारा ‘दीदी पुरस्कार’ वितरण व भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सादरीकरणातून होणाऱ्या ‘विश्वमोहिनी लता दीदी’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदाचा ‘दीदी पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका विभावरी आपटे-जोशी यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संयोजन समिती सदस्य व गायिका मनीषा निश्चल यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाची व्यवस्था पाहणारे निश्चल लताड, सत्यजित धांडेकर यावेळी उपस्थित होते.
 
मनीषा निश्चल म्हणाल्या, “संगीत क्षेत्रामध्ये सातत्याने भरीव, उत्तुंग व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने लतादीदी मंगेशकर यांच्या नावाचा दीदी हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार विभावरी आपटे-जोशी यांना जाहीर झाला असून, येत्या बुधवारी (दि. २०) सायंकाळी ५ ते रात्री १२ या वेळेत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दोन सत्रांत होणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सादरीकरणातून होणाऱ्या ‘विश्वमोहिनी लता दीदी’ या सांगीतिक कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होतील.”
 
“या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे राहुल देशपांडे एका वेगळ्या स्वरूपात ऐकता येणार आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या रचना व मंगेशकर आणि देशपांडे कुटुंबियातील जुन्या आठवणी श्रोत्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. तसेच लतादीदींनी काही गाणी व त्यातील बारकावे राहुल देशपांडे यांच्याकडून ऐकता येतील. लतादीदींनी गायलेल्या अजरामर मराठी व हिंदी गाण्यांचे सादरीकरण ‘विश्वमोहिनी लता दीदी’ या सांगीतिक मैफलीतून होणार असून, यामध्ये विभावरी आपटे-जोशी, प्राची देवल, श्रेयस बेडेकर, मनीषा निश्चल सादरीकरण करणार आहेत. रवींद्र खरे यांचे ओघवते निवेदन, विवेक परांजपे, राजेंद्र दूरकर, प्रसाद गोंदकर, अमृता ठाकूरदेसाई, ऋतुराज कोरे, विशाल थेलकर, विशाल गन्द्रतवार, निलेश देशपांडे यांची वाद्यांवर साथसंगत असणार आहे. हा कार्यक्रम पूर्णतः विनामूल्य आहे,” असे मनीषा निश्चल यांनी सांगितले.
 
सत्यजित धांडेकर म्हणाले, “अखंड विश्वाला सुरेल आवाजाने मोहिनी घालणाऱ्या लतादीदींची प्रेरणा घेत मनीषा निश्चल गेली तीन दशके आपल्या सुमधुर गायनाने संगीतसेवा करीत आहेत. मंगेशकर कुटुंबियांशी त्यांचा स्नेह अतूट आहे. लतादीदींच्या स्मरणार्थ होत असलेल्या या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने मनीषा निश्चल पार पाडत आहेत. आपल्या महक संस्थेच्या माध्यमातून लतादीदींची गाणी गात राहण्याची इच्छा बाळगून त्या मेहनतीने व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *