भारतीय तरुणांना ‘कोरियन’मध्ये उच्च शिक्षण, नोकरीच्या मोठ्या संधी

भारतीय तरुणांना ‘कोरियन’मध्ये उच्च शिक्षण, नोकरीच्या मोठ्या संधी

डॉ. एउन्जु लिम; इंडो-कोरियन सेंटर, किंग सेजोंग इन्स्टिट्यूट पुणेतर्फे वक्तृत्व स्पर्धा, करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन

पुणे : “भारतातील कोरियन कंपन्यांत नोकरीच्या अनेक संधी आहेत. तसेच कोरियन विद्यापीठांतून उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतीयांना प्रोत्साहन दिले जात आहे. इंडो-कोरियन सेंटरतर्फे सुरु केलेल्या करिअर डेव्हलपमेंट सेंटरमुळे (सीडीसी) कोरियन भाषा शिकणाऱ्या तरुणांना भारतातील कोरियन कंपन्यांमध्ये प्लेसमेंट होण्यास, तसेच उच्च शिक्षणासाठी कोरियन विद्यापीठांत प्रवेशासासाठी मार्गदर्शन मिळेल,” अशी माहिती किंग सेजोंग इन्स्टिट्यूट पुणेच्या संचालिका डॉ. एउन्जु लिम यांनी दिली.
 
 
कोरियाच्या सांस्कृतिक, क्रीडा व पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापित इंडो-कोरियन सेंटरच्या (आयकेसी) किंग सेजोंग इन्स्टिट्यूटमध्ये (केएसआय) कोरियन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण व करिअर डेव्हलपमेंट सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. लिम बोलत होत्या. बालेवाडी येथील इंडो-कोरियन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी कोरिया प्रजासत्ताकचे मुंबईतील डेप्युटी कॉन्सुल दुशिक किम, इंडो-कोरियन सेंटरचे सहसंस्थापक संजीब घटक, मायमा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. आदित्य बावडेकर, पॉस्को महाराष्ट्र स्टीलचे प्रशिक्षण विभाग प्रमुख चिरंजीव मैनी, एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे एचआर हेड प्रशांत शेखर, ओहसंग इंडियाचे महाव्यवस्थापक पार्क ओल सांग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कोरियन आणि भारतीय फ्युजन नृत्य आणि कोरियन पारंपरिक गायनाने उपस्थितांची मने जिंकली.
 
एकूण १२ विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोरियन भाषेतील वक्तृत्व केले. चिराग जलादी याने प्रथम, तनु मिश्राने द्वितीय, सावनी राजपाठकने तृतीय, तर तन्वी जोशी व नेहा कुलकर्णी यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. प्रथम आलेल्या चिरागची कोरियामध्ये होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय फेरीच्या मुलाखतीसाठी निवड झाली आहे. विजेत्यांना एलजीतर्फे स्मार्ट टीव्ही, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवस्थापक जिओंगकेउल जिओंग, कोरियन लँग्वेज स्कुलच्या प्राचार्या ईऊनही अन, उरी बँकेचे व्यवस्थापक जैबॉन्ग ली यांनी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण केले.
 
दुशिक किम यांनी कोरियातील शिक्षण व नोकरीच्या संधींविषयी माहिती दिली. चिरंजीव मैनी आणि प्रशांत शेखर यांनी अनुक्रमे पॉस्को आणि एलजी कंपनीविषयी, तसेच त्यांना लागणाऱ्या मनुष्यबळाविषयी माहिती देत कोरियन भाषा येणाऱ्या तरुणांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. संजीब घटक यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *