चांगल्या आरोग्यासाठी ‘हर्बल गार्डन’ उपयुक्त

चांगल्या आरोग्यासाठी ‘हर्बल गार्डन’ उपयुक्त

रामदास आठवले यांचे प्रतिपादन; महाराष्ट्र हौसिंग सोसायटीत उद्यानाचे लोकार्पण

पुणे : “चांगल्या आरोग्यासाठी हर्बल गार्डन अतिशय उपयुक्त आहे. येथील औषधी वनस्पती, त्याचा येणारा सुवास, त्यामुळे मुलांना उद्यानात खेळताना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होणार आहे. ‘भाजप-रिपाइं’ युतीमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. या विकासकामांसह हर्बल गार्डन, उद्याने यामुळे पुणे राहण्यासाठी अधिक चांगले बनत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पुण्याचा विकास पाहून मलाही मुंबई सोडून पुण्यात राहण्यास यावेसे वाटतेय, असे आठवले यांनी मिश्कीलपणे सांगितले.

माजी उपमहापौर नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या संकल्पना व विकास निधीतून उभारलेल्या ‘वीरचक्र सन्मानित कर्नल सदानंद साळुंके हर्बल गार्डन’चे लोकार्पण रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. प्रसंगी उपमहापौर सुनीता वाडेकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कर्नल (नि.) सदानंद साळुंके, ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. आयुब शेख, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, स्थानिक नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी, फरझाना शेख, माजी नगरसेवक अशोक कांबळे, मंगेश गोळे आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “१९७१ च्या युद्धात योगदान दिलेल्या कर्नल सदानंद साळुंके यांच्या नावाने हे औषधी उद्यान झाले, याचा आनंद आहे. या उद्यानातून आरोग्याला पूरक गोष्टी, तसेच मुलांना औषधी वनस्पतींविषयीचे ज्ञान मिळेल. गेल्या पाच वर्षात पुण्यात विकासकामांची मालिका सुरु आहे. रस्ते, पाणी, उद्याने, वाहतूक व्यवस्था, मेट्रो, उड्डाणपूल असे अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. डॉ. धेंडे यांनी आपल्या भागातील इतर नगरसेवकांच्या सहकार्याने चांगले काम केले आहे. येत्या निवडणुकांत भाजप-रिपाइं युतीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही.”

जगदीश मुळीक म्हणाले, “या औषधी उद्यानाचा या भागातील नागरिकांना लाभ होईल. आरोग्याच्या दृष्टीने हे उद्यान अतिशय उपयुक्त आहे. ‘स्वप्नपूर्ती’ करण्याचे काम भाजप-रिपाइं युतीने केले. पुणे मेट्रोच्या उद्घाटनासह इतर उपक्रमांचे लोकार्पण व अनावरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, याचा अभिमान वाटतो. गेल्या ५० वर्षात जितकी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक पटींनी पाच वर्षात विकासाची कामे झाली. विरोधी पक्ष केवळ राजकारण करण्यात दंग असून, प्रशासक बसवून निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव आखत असले, तरी महापालिकेत भाजप-रिपाइंचीच सत्ता येणार आहे.”

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी स्वागत प्रास्ताविकात उद्यानाची उभारणी, त्याचे महत्व याविषयी माहिती दिली. कर्नल सदानंद साळुंके यांनी आपल्या नावाने उद्यान उभारल्याबद्दल डॉ. धेंडे, महापालिका व स्थानिक नागरिकांचे आभार मानले. सुनीता वाडेकर, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण, कर्णे गुरुजी यांनीही मनोगते व्यक्त केली. ऍड. आयुब शेख यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *