सावित्रीज्योती फुले यांना ‘भारतरत्न’ द्यावा : बंधुताचार्य प्रकाश रोकडे

सावित्रीज्योती फुले यांना ‘भारतरत्न’ द्यावा : बंधुताचार्य प्रकाश रोकडे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सप्ताहाच्या निमित्ताने ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ कविसंमेलन 
 
पुणे : “थोर समाजसुधारक सावित्रीबाई आणि महात्मा फुले अर्थात सावित्रीज्योती फुले यांचे महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांसाठी सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक कार्य पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक आणि दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना त्वरित ‘भारतरत्न’ किताब देऊन सन्मानित करावे,” अशी आग्रही मागणी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केली.
 
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सप्ताहाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महिला विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ कवयित्री संमेलनाच्या उद्घाटनावेळी रोकडे बोलत होते. प्रेरणा कांबळे या विद्यार्थिनीने सावित्रीबाईंच्या पेहरावात ‘मी सावित्री’ हा एकपात्री प्रयोग सादर केला.
 
औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात झालेल्या कविसंमेलनात तेविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष अरुण बोऱ्हाडे, स्वागताध्यक्ष संतोष बारणे, कार्याध्यक्ष प्रकाश जवळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, कवी संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री मधूश्री ओव्हाळ, साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे, गझलकार संतोष घुले, ज्ञानेश्वर कांबळे, संतोष पाचुंदकर, प्रा. बी. एस. पाटील आदी उपस्थित होते. 
 
प्रकाश रोकडे म्हणाले, “सावित्रीबाई आणि ज्योतिबा हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना वेगवेगळे संबोधने शक्य नाही. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे आणि महिलांच्या उद्धाराचे केलेले कार्य आदर्शवत आहे. त्यांच्यामुळेच आज महिला सन्मानाने जगत असून, प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठत आहे.”
कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मधुश्री ओव्हाळ होत्या. मीनाक्षी पाटोळे, जयश्री रोहनकर, डॉ. नीलम गायकवाड, मीना शिंदे, लीला डोहळे, सुमन आव्हाड, डॉ. सविता पाटील या निमंत्रित कवयित्री, तर शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी झाल्या. प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी सूत्रसंचालन करताना ‘सावित्रीज्योती’ यांच्या कार्याचा जीवनपट उलगडत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
 
अरुण बोऱ्हाडे, संतोष बारणे, डॉ. अरुण आंधळे, प्रकाश जवळकर यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. संजय नगरकर, प्रा. बी. एस. पाटील यांनी संयोजन, प्रास्ताविक केले. डॉ. सविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आसावरी शेवाळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *