केंद्र सरकारने अण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकारांच्या यादीत त्वरित समाविष्ट करावे
महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीची मागणी; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा
पुणे : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रबोधनकारांच्या यादीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. या अक्षम्य चुकीबद्दल आणि अवमानाबद्दल केंद्र सरकारने जनतेची माफी मागावी व येत्या ४८ तासांत अण्णाभाऊ साठे यांचे नाव या यादीत त्वरित समाविष्ट करावे, अशी मागणी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीने केली आहे.
बहुजन वंचित आघाडीचे युवक प्रदेश अध्यक्ष सागर सुखदेव जाधव यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. येत्या ४८ तासांत अण्णाभाऊ साठे यांचे नाव समाविष्ट करून जनतेची माफी मागितली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही जाधव यांनी दिला आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारनेही केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जाधव यांनी हे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र व संबंधित अधिकाऱ्यांना प्रांताधिकारी व ईमेलद्वारे पाठवले आहे.
“अण्णाभाऊ साठे हे थोर साहित्यिक, लोकशाहीर आहेत. त्यांनी आपल्या साहित्यातून, शाहिरीतून प्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे. अशा वंदनीय प्रबोधनकाराला या यादीतून वगळणे अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. केंद्र सरकारने या चुकीची दुरुस्ती केली नाही, तर महामार्ग रोको, रेल्वे रोको आंदोलन करणार आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडली किंवा कार्यकर्त्यांना कोणतीही इजा झाली, तर त्याला राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार असेल,” असे सागर जाधव यांनी नमूद केले आहे.