गावाला संविधानमय बनविण्यासाठी शिक्षक विजय वडवेराव यांच्याकडून संविधान वाटप
पुणे: मुळशी तालुक्यातील गोडांबेवाडी नं. १ हे गाव देशातील पहिले संविधानमय गाव झाले आहे. शासनाच्या ‘घरघर संविधान’ योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक विजय वडवेराव यांनी पुढाकार घेऊन गोडांबेवाडीतील प्रत्येक घरात संविधान पोहोचवले आहे. गावातील नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत भारतीय संविधानाचे महत्त्व स्वीकारून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्यावर भर दिला आहे.

सर्वसामान्य नागरिकांत संविधानाचा प्रचार व प्रसार व्हवा, संविधान जागृती व्हावी म्हणून विजय वडवेराव महाराष्ट्रभर संविधानदूत म्हणून कार्य करत आहेत. त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना संविधानदूत म्हणून तयार केले असून, स्वखर्चातून त्या सर्व विद्यार्थ्यांना संविधानदूत गणवेश दिला. त्यांनी विद्यार्थ्यांकडून संविधान उद्देशिका व संविधानातील नागरिकांचे हक्क, अधिकार व कर्तव्ये तोंडपाठ करून घेतली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना संविधानाची गोडी लावत शालेय वयातच त्यांच्या मनात संविधानाविषयी आदरभाव, प्रेम निर्माण करून त्यांच्यात सांविधानिक मूल्ये रुजवली आहेत.
वडवेराव यांनी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन २६ नोव्हेंबर २०२४ या संविधान दिनापासून गावात संविधान जागर अभियान सुरु केले व गावात ‘संविधानमय कुटंब’ हा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबात, सर्व वीटभट्टया, बांधकाम ठिकाणावर प्रत्यक्ष जात कष्टकरी, मजूर, शेतकरी अशा समाजातल्या तळागाळातील अगदी शेवटच्या घटकाला भारतीय संविधानाने त्यांना दिलेले हक्क अधिकार व कर्तव्ये समजावून सांगितली.
विजय वडवेराव म्हणाले, “प्रत्येक कुटुंबात संविधानाच्या प्रतीचे मोफत वाटप केले. प्रत्येक कुटंबाच्या दरवाजावर संविधामय कुटुंब असे स्टिकर लावून कुटुंब क्रमांक टाकण्यात आला. गोडांबेवाडी नं. १ या वाडीतील जवळपास १२० कुटुंबात भारतीय संविधान मोफत दिले. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात संविधान असणारे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील हे गाव देशातील पहिले संविधानमय गाव ठरले आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप गोडांबे, रिहे केंद्राचे केंद्रप्रमुख शशिकांत मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक, ग्रामस्थ, घोटावडे ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली कुंभार, ग्रामपंचायत सदस्य संतोष गोडांबे, शाळेतील सहशिक्षक व रिहे केंद्रातील आदिनाथ बोरकर व इतर सर्वच सहकारी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले.”