ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे ‘बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड’ व आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे ‘बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड’ व आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

औद्योगिक प्रगतीसह जागतिक हवामान बदल, शाश्वत विकासावर भर हवा : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : “प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना पर्यावरण, हवामान बदल आणि शाश्वत विकासाच्या मुद्यांवरही आपण भर दिला पाहिजे. कार्बन उत्सर्जन थांबवण्याच्या प्रयत्नात सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम जागतिक स्तरावरील उद्योगांना एकत्रित आणून शाश्वत विकासासाठी पुढाकार घेत आहे,” असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

ग्लोबल इंडिया बिझिनेस फोरमतर्फे (जीआयबीएफ) आयोजित ‘बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड २०२१’ कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. हॉटेल रमाडा प्लाझा येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी मोरोक्कोचे राजदूत मोहम्मद मलिकी, कॉस्टरीकाचे राजदूत क्लॉडीओ अनसोरेना, अझरबैजानचे राजदूत डॉ. मोहम्मद मालिकी, नायजेरियाचे उच्चायुक्त अहमद सुले यांच्या वतीने ख्रिस्तोफर केके, ‘जीआयबीएफ’चे अध्यक्ष जितेंद्र जोशी, समन्वयिका दीपाली गडकरी आदी उपस्थित होते. मोरोक्को, कॉस्टरिका, अझरबैजान, नायजेरियाच्या राजदूतांनी भारतीय उद्योजकांना त्यांच्या देशात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

 
यावेळी डॉ. गोऱ्हे व राजदूतांच्या हस्ते उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उद्योगावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात चारही देशांच्या राजदूतांनी त्यांच्या देशातील उद्योगांच्या संधींविषयी माहिती दिली. चौघांचेही खास पुणेरी पगडी घालून स्वागत केल्यांनतर ते भारावून गेले. प्रसंगी मान्यवरांच्या ‘बिझनेस टायकून’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. इंडिया-मोरोक्को बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल, इंडिया-कॉस्टरिका बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल, इंडिया-अझरबैजान बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल, इंडिया-नायजेरिया बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल या चार कौन्सिलची स्थापना करण्यात आली.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आर्थिक-सामाजिक संबंध दृढ होणारे अनेक उपक्रम महाराष्ट्र सरकार राबवत आहे. सामाजिक व आर्थिक बदलाना सामोरे जात असताना पर्यावरण बदलासारख्या विषयाची योग्य जाण आणि माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक देशाकडे त्याविषयी नियोजन असणे गरजेचे आहे. २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करायचे आहे. यासाठी सर्वाना मिळून प्रयत्न करावे लागतील. महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीसाठी आपले स्वागत आहे. त्यांना आवश्यक गोष्टी पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकार तत्पर आहे.”
 
डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “विविध देशांतील उद्योग, संस्कृती याची देवाण घेवाण व्हावी, यासाठी बिझनेस अँड कल्चरल कौन्सिलची स्थापना करण्यात आली आहे. एमएसएमई क्षेत्राच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न केला पाहिजे. व्यावसायिक, उद्योजक, चेंबर्स, विविध देशांचे दूतावास यांना एका व्यासपीठावर आणुन उद्योग क्षेत्राची प्रगती करण्याचा ‘जीआयबीएफ’चा उद्देश आहे.” नीलकमल आंचन यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली गडकरी यांनी आभार मानले.
 

मोरोक्को, कॉस्टरिका, अझरबैजान, नायजेरियाच्या राजदूतांनी

भारतीय उद्योजकांना केले गुंतवणूक करण्याचे आवाहन

‘मोरोक्को’चे मोहम्मद मलिकी म्हणाले, “अत्याधुनिक पायाभूत सुविधा, व्यापाराची मार्गदर्शक तत्वे, कुशल मनुष्यबळ अशा अनेक चांगल्या गोष्टी मोरोक्कोमध्ये उपलब्ध आहेत. भारतीय उद्योजकाना मोरोक्कोत आपला उद्योग सुरु करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाते. अतिशय सुलभ पद्धतीने येथील व्यापाराच्या प्रक्रिया आणि प्रणाली आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन, ऊर्जा, ऑटोमोबाईल, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, हरित ऊर्जा क्षेत्रात चांगल्या संधी आहेत.”
 
क्लॉडीओ अनसोरेना म्हणाले, “सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या कॉस्टरिकामध्ये औषधनिर्माण, सिलिकॉन इंडस्ट्रीमध्ये व्यापाराच्या, तसेच ब्रॉडकास्टिंग साहित्य, पेट्रोलियम, बांधकाम साहित्य याची मोठी आयात होते. तर साखर, केळी, वैद्यकीय उपकरणे, ऑर्नामेंटल प्लांट्स याची निर्यात होते. पर्यटन क्षेत्र खुणावत आहे. भारतीय लोकशाही जगात सर्वात मोठी आहे. आम्ही भारताकडून अनेक गोष्टी शिकतो आहोत. कॉस्टरिका हे जगभरातील उद्योजकांसाठी एक नामांकित केंद्र बनत आहे.”
 
डॉ. मोहम्मद मालिकी म्हणाले, “अझरबैजान हे मशिनरी, जेम्स व धातू, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, स्टील, वाहने, लाकूड, मिनरल फ्युल, एअरक्राफ्ट्सची मोठी आयात करते. इंधन, फळे, ड्रायफ्रूट्स, भाजीपाला, जेम्स आणि धातू, कापूस, अल्युमिनियम, प्लास्टिक, ऑरगॅनिक केमिकल्स, मीठ, सिमेंट, दगड आदी गोष्टींची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. आयात-निर्यात, तसेच उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी अझरबैजान चांगला पर्याय आहे. आमच्या देशात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांना सुलभ प्रक्रिया उपलब्ध केली जात आहे.”
 
“पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिद्ध नायजेरियामध्ये जागतिक स्तरावर व्यापाराच्या मोठ्या संधी आहेत. कृषी, तेल, गॅस, शिक्षण, उत्पादन, जलशुद्धीकरण क्षेत्रात गुंतवणुकीला वाव आहे. मशिनरी, कम्प्युटर्स, शिप्स, बोट्स, वाहने, प्लास्टिक, इलेक्ट्रिक मशिनरी, मासे, धान्य, स्टीलची मोठी आयात होते. जहाज, मिनरल फ्युएल, तेलबिया, कोकोआ, खाते, फळे, तंबाखू, लेदर, अल्युमिनियमच्या निर्यातीत नायजेरिया अग्रेसर आहे. परदेशी गुंतवणुकीसाठी नायजेरिया स्वागत करत आहे,” असे ख्रिस्तोफर केके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *