राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे प्रतिपादन; ‘जीआयबीएफ’तर्फे ‘उद्योगातील आंतरराष्ट्रीय संधी’वर सेमिनार
पुणे : “सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांना प्रोत्साहन व पाठिंबा देण्याचे काम ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) करत आहे. ‘जीआयबीएफ’चे हे योगदान आत्मनिर्भर भारतासाठी अतिशय महत्वपूर्ण व दिशादर्शक आहे,” असे प्रतिपादन कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले.
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे (जीआयबीएफ) ‘उद्योगातील आंतरराष्ट्रीय संधी’ या विषयावर आयोजित सेमिनारमध्ये गेहलोत बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते लघु व मध्यम उद्योजकांना उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड्स’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘जीआयबीएफ’चे संस्थापक डॉ. जितेंद्र जोशी, संचालक दीपाली गडकरी यांच्यासह अनेक देशांचे राजदूत आणि कौन्सिल जनरल उपस्थित होते.
त्रिनिदाद व टोबॅगो उच्चायुक्त डॉ. रॉजर गोपॉल, नवी दिल्लीतील बेलारूसच्या दूतावासाचे वरिष्ठ कौन्सिल विटाली मिरुत्को, फिजी उच्चायुक्तालयाचे कौन्सिलर निलेश कुमार, नायजर उच्चायुक्तालयाचे कौन्सिलर मुस्तफा डायोरी, भारतीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे आदींची विशेष उपस्थिती होती. आपल्या देशातील उद्योग विस्ताराच्या संधींबद्दल त्यांनी माहिती दिली.
‘एमएसएमई’ क्षेत्रातील उद्योजकांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ‘जीआयबीएफ’तर्फे नियमितपणे सेमिनार आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमावेळी पाच देशांचे राजदूत सहभागी झाले होते. भारतीय बाजारपेठेवर, तसेच त्यांच्या देशातील उद्योगांसाठी असलेल्या संधींवर त्यांनी चर्चा केली. उद्योग क्षेत्रासह शिक्षण, महिला सक्षमीकरण, प्रशासन, पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रातील मान्यवरांचाही यावेळी गौरव करण्यात आला. ‘जीआयबीएफ’ ही संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी कार्यरत आहे, असे डॉ. जितेंद्र जोशी यांनी सांगितले.
थावरचंद गेहलोत म्हणाले, “उद्योग व इतर क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून प्रेरणा देण्याचा ‘जीआयबीएफ’चा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे व्यवसाय वृद्धीला चालना मिळेल. तसेच नवीन उद्योग उभारण्यासाठी तरुण पिढी पुढे येईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग विस्तारण्यासाठी हे व्यासपीठ अतिशय उपयुक्त आहे. सर्व देशांचे राजदूत आणि पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतो.”
डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “भारत सरकारचे ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘जीआयबीएफ’ प्रयत्नशील आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनसारख्या कठीण परिस्थितीनंतर भारतातील सर्व लघु व मध्यम क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याच्या ध्येयाने आम्ही कार्यरत आहोत.” ‘जीआयबीएफ’च्या संचालिका दिपाली गडकरी यांनी ‘ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम विशेषत: महिलांचे समर्थन आणि योगदानाबद्दल सत्कार करत असल्याचे नमूद केले.