संगमेश्वर / माखजन : येथील गडनदीला पूर आला असून माखजन बाजार पेठमध्ये पाणी शिरले आहे. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याचे कळताच चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार शेखर निकम यांनी तातडीने व्यापाऱ्यांची भेट घेतली व येथील पुरग्रस्त भागाची पाहणी करून व्यापाऱ्यांना धीर देत प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
कोकण भागात सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून संगमेश्वर तालुक्यातील गडनदीला पूर आला आहे. हे पुराचे पाणी माखजन येथील बाजारपेठेत शिरले आहे. दुकानांसह रस्त्यावर पाणी साचल्याने बाजारपेठ बंद पडून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे आधीच कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या कडक निर्बंधांमुळे पाहिजे तसा ग्राहकवर्ग मिळत नसल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या व्यापारी वर्गात दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील कोणत्याही संकटात येथील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी याही वेळेस तत्परतेने पुरग्रस्त भागास स्वतः जातीने भेट देत पाहणी केली. या भागातील बाधित व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर दिला. तसेच निकम यांनी पुराचा आढावा घेतला व पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
