कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

पुणे शहरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी

युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन; गृहमंत्री, विभागीय आयुक्तांना ईमेल करणार

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद, संतापजनक अपशब्द वापरत गरळ ओकणाऱ्या कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पुणे शहरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसने केली. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मंगळवारी दिले. याच मागणीचे निवेदन गृहमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे पाठवणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. पुणे शहर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल शिरसाठ, वरिष्ठ उपाध्यक्ष सौरभ अमराळे, उपाध्यक्ष आशिष व्यवहारे, अक्षय माने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस पदाचे उमेदवार प्रथमेश आबनावे उपस्थित होते.
 
महात्मा गांधी यांचा ‘हरामी’ असा उल्लेख करत त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे समर्थन करणाऱ्या कालीचरण महाराजांचे वक्तव्य गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपाचे आहे. महाराष्ट्रातील अकोल्याचे रहिवासी असलेल्या कालीचरण महाराज यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्म संसदेत हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जगभरात भारताला गांधींचा देश म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आपण सर्व जाणतो. मात्र, कालीचरण महाराज आणि धर्म संसदेतील काही धर्मांध व्यक्ती अशी वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कालीचरण महाराज यांच्या मूर्खपणाच्या वक्तव्याने महात्मा गांधी यांच्यासह अखंड भारतातील जनतेचा अपमान झाला असून, भावना दुखावल्या गेल्या आहेत. 
 
अशा प्रकारचे राष्ट्रद्रोही आणि संतापजनक वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज यांच्यावर तातडीने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच आगामी काळात कालीचरण महाराज यांना पुणे शहरात कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना पुणे शहरात प्रवेशबंदी करावी, अशी आमची मागणी आहे. पुणे शहरात त्यांचे कार्यक्रम झाले आणि अशी वादग्रस्त विधाने केली, तर समाजामध्ये तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा व सुरक्षा व्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे आपणास आदरपूर्वक विनंती की, आपण संबंधित वक्तव्याची दखल घेऊन तातडीने कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, तसेच पुणे शहरात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *