Post Views: 2
पुणे: “अन्नदाता शेतकरी आज चेष्टेचा, उपहासाचा विषय ठरला आहे. हाच शेतकरी जोवर सन्मानाचा, प्रतिष्ठेचा विषय होत नाही, तोवर आमचा लढा आणि संघर्ष सुरूच राहील,” असे प्रतिपादन माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. शेतीव्यवसायात बुवाबाबांचा शिरकाव, मंत्रतंत्राचा वापर चीड आणणारा असल्याचेही सांगून मंत्रा-तंत्राने शेती यशस्वी झाली असती, तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या का? असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला.

सरहद पुणे आणि कृष्णा पब्लिकेशन यांच्या वतीने आयोजित शहीद भगतसिंह यांच्या पुतणीने लिहिलेल्या ‘युगदृष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज’ या भगतसिंह यांच्या अधिकृत जीवनचरित्राचे प्रकाशन व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या राजू शेट्टी यांना ‘युगदृष्टा भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात शेट्टी यांना भगतसिंह यांचे पुतणे व विचारवंत किरणजितसिंह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मायदेश फाऊंडेशनचे अरुण जोशी, सत्यशील राजगुरू, ज्येष्ठ उद्योगपती कृष्णकुमार गोयल, सरहद संस्थेचे संजय नहार, कृष्णा पब्लिकेशनचे संचालक चेतन कोळी, अनुवादक इंद्रायणी चव्हाण, प्रसिद्ध व्याख्याते केतन पुरी आदी उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, “ज्यांच्या नावाचा, कार्याचा आदर्श घेत चळवळीत उतरलो, आज त्याच सरदार भगतसिंह यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे, हा माझा फार मोठा सन्मान आहे. भगतसिंह यांनी अगदी कोवळ्या वयात देशाच्या भवितव्याबद्दल, शेतकरी, कष्टकरी, वंचित, शोषित यांच्यासाठी भूमिका घेतली, जे विचार मांडले आणि लेखन केले, ते प्रेरणादायी आहेत. तीच प्रेरणा घेऊन आजवर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. संसदेत राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्यांना व्यासपीठ दिले. हे सारे निर्भयपणे केले. माझ्यावर वैयक्तिक हल्ले झाले. संघटना फोडण्याचे प्रकार केले गेले. माझे सहकारी दूर करण्यात आले. पण न डगमगता मी लढत राहिलो आहे आणि यापुढेही लढत राहीन.”
किरणजितसिंह म्हणाले, “भगतसिंह व्यक्तीपुरते मर्यादित नव्हते. ती विचारधारा आहे. क्रांतीकार्य करणारे आणि बलिदान देणारे भगतसिंह सर्वपरिचित आहेत, पण मानवी जीवनाला सर्वोच्च स्थान देणारे, शेतकरी, कामगार, वंचित, शोषित, श्रमजीवी आणि महिलांविषयी आस्था बाळगणारे, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी झटणारे, राष्ट्रीय अस्मितेसाठी असेंब्लीत बाॅब टाकणारे आणि जुलमी ब्रिटिश अधिकार्यांवर गोळ्या झाडणारे भगतसिंह, असे त्यांचे अनेक पैलू आहेत. भगतसिंहांनी त्यांच्यावरील सर्व खटल्यांत स्वतःच बाजू मांडली आणि ती मांडताना ती न्यायालये त्यांनी वैचारिक व्यासपीठे बनवली. अन्यायाविरोधात संघर्ष, ही त्यांची भूमिका आजच्या पिढीला प्रेरक ठरेल.”
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात केतन पुरी यांनी भगतसिंहांचा धगधगता जीवनप्रवास, त्यांच्या प्रेरणांसह प्रेक्षकांसमोर ठेवला. क्रांतिकारक भगतसिंह द्रष्टे विचारवंत, सिद्धहस्त लेखक, ध्येयनिष्ठ राजकारणी, उत्तम वक्ते अशा सर्वच पैलूंनी युक्त असे व्यक्तिमत्त्व होते. किशोरवयापासूनच त्यांनी जीवनाचे ध्येय निश्चित केले होते. त्यांचे योगदान तरुणाईसाठी प्रेरक आहे, असे ते म्हणाले.
अरुण जोशी यांनी मायदेश फाऊंडेशनची माहिती दिली. कृष्णकुमार गोयल, संजय नहार, अनुवादक इंद्रायणी चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. चेतन कोळी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. देवदत्त भिंगारकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.