Post Views: 97
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन; आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाँलॉजीतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे, ता. १९ : “भावी काळातील जागतिक नेतृत्व तंत्रज्ञानाच्या कुशल वापरातून पुढे येणार आहे. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केल्यास, समाज व देशाचे शोषणमुक्त सक्षमीकरण सहज शक्य आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले. ‘तंत्रकुशल विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही युगात देशाच्या विकासप्रक्रियेत याच जाणीवेतून योगदान द्यावे’, असे आवाहनही डॉ. काकोडकर यांनी केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एआयटी) ३० व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून डॉ. काकोडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. काॅलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांच्या हस्ते डॉ. काकोडकर यांना गौरवण्यात आले. प्रसंगी एआयटीचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, एआयटीचे अध्यक्ष मेजर जनरल टी. एस. बेन्स, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीचे औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, तसेच सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.
संस्थेचे माजी विद्यार्थी अंकुश तिवारी यांचा ‘यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. लेफ्ट. जनरल ए. के. रमेश यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. चीफ ऑफ आर्मी स्टाफ अष्टपैलू विद्यार्थ्यांसाठीचा फिरता करंडक भावना निमगडा हिला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी क्रीडा पुरस्कार जी. राजशेखर स्मृतीचिन्ह क्रीडापटू विक्रांत कुमार यांना देण्यात आले. चारही शाखेतील उत्कृष्ट विद्यार्थिनींना ‘जिओसी-इन-सी’ पारितोषिक देण्यात आले. डॉ. अश्विनी सपकाळ (सर्वोत्कृष्ट शिक्षक), प्रो. सीता यादव (सर्वोत्कृष्ट संशोधक), प्रवीण सांगळे (सर्वोत्कृष्ट टेक्निकल स्टाफ) आणि सी. नागराज रेड्डी (सर्वोत्कृष्ट प्रशासकीय कर्मचारी) यांचाही सन्मान करण्यात आला. विविध शिष्यवृत्तीचे वितरण यावेळी करण्यात आले.
डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, “आधुनिक काळात जागतिक स्तरावरील नेतृत्वाची तंत्रज्ञान हीच गुरुकिल्ली आहे. मर्यादित साधनस्रोतांमध्ये, कमी खर्चात आपण विकसित केलेले रिफ्लेक्टर्स हे तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराचे उत्तम उदाहरण आहे. युरेनियमची कमतरता असूनही आपण अणुक्षेत्रात घेतलेली भरारी मूळ तंत्रज्ञानाच्या कुशल वापरामुळे शक्य झाली. अणुतंत्रज्ञान हे केवळ लष्करी सामर्थ्याशी न जोडता, ते समाजाच्या हितासाठीच्या सुविधांच्या निर्मितीशी जोडण्यात आपण यशस्वी झालो आहोत, हे लक्षात घेत तरुणाईने आपल्या तंत्रकुशलतेचा देशाच्या विकासासाठी विनियोग केला पाहिजे.”
लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश म्हणाले, “विकासाच्या वाटेवर गतीने जाणाऱ्या आपल्या देशासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. जागतिक स्तरावरील वास्तव तंत्रज्ञानाचे महत्त्व सातत्याने वाढणार असल्याचे स्पष्ट करत आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचे प्राबल्य असणार आहे. शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी आपली तंत्रकुशलता घेऊन वाटा उचलण्याच्या असंख्य संधी आहेत. नव्या जगात कौशल्ये, तंत्रस्नेही वावर आणि शहाणपण, यांच्या एकत्रीकरणातून ज्ञानाचे मार्ग निर्माण होणार आहेत.”
ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे सादरीकरण केले. ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा अभ्यासक्रम लवकरच सुरू करत असल्याचे ते म्हणाले. संस्था स्वायत्ततेच्या दिशेने जात असून, प्लेसमेंटचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
१९९९ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रणव बैरागी यांनी मनोगत मांडले. मेजर जनरल टी. एस. बेन्स यांनी आभार मानले. दीक्षा सिंग आणि अनिकेत डिगोळे यांनी सूत्रसंचालन केले.