पुणे : राज्यात काही पक्ष, संघटनांकडून जाती-धर्मात तेढ निर्माण करून अशांतता पसरविण्याचा कुटील डाव रचण्यात येत आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांप्रमाणे पुणे पोलीस आयुक्तांनीही धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा कार्यक्रमांना प्रतिबंध घालावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) वतीने करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी यावर सकारात्मकता दर्शवत योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे.
या मागणीचे निवेदन शुक्रवारी ‘रिपाइं’च्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना देण्यात आले. ‘रिपाइं’ शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, माजी अध्यक्ष अशोक शिरोळे यांनी गुप्ता यांची भेट घेऊन अशा कार्यक्रमांना परवानगी न देण्याची आग्रही मागणी केली.
मशिदीच्या परिसरात अजानच्या वेळेला कुठल्याही प्रकारची भक्तीगीते, प्रार्थना किंवा धार्मिक तेढ निर्माण होणारे कार्यक्रम साउंडवर लावण्यास बंदी घालावी. तसेच स्पीकरवरून अजान म्हणताना त्याचाही आवाज घालून दिलेल्या मर्यादेत असावा. राजकीय वक्तव्य, प्रक्षोभक भाषणे करण्यास प्रतिबंध घालावा. दोन समाजात वाद निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि धर्मनिरपेक्षतेचे, शांततेचे जतन करावे, असे आवाहन ‘रिपाइं’च्या वतीने निवेदनाद्वारे केले आहे.