डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे मत; मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सिम्बायोसिस रुग्णालयातील ‘एनआयसीयू’ अद्ययावत
पुणे : “सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उभारण्यावर भर हवा. त्यासाठी औद्योगिक सामाजिक बांधिलकीचा (सीएसआर) चांगला उपयोग करून घ्यायला हवा. छाब्रिया दाम्पत्याप्रमाणे इतरांनीही ‘सीएसआर’मार्फत आरोग्यसुविधा अत्याधुनिक व सक्षम बनवल्या, तर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात चांगले उपचार मिळू शकतील,” असे मत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने लवळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी अद्ययावत केलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे (एनआयसीयू) उद्घाटन डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते झाले.
‘फिनोलेक्स’चे अध्यक्ष प्रकाश प्रल्हाद छाब्रिया, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, ‘सिम्बायोसिस’चे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर, ‘एनआयसीयू’ प्रमुख डॉ. अंजली खेर, डॉ. नितीन लिंगायत, ‘फिनोलेक्स’चे व्यवस्थापकीय संचालक अजित व्येंकटरामन, माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल वाभी, मुकुल माधव फाउंडेशनचे सचिन कुलकर्णी, बबलू मोकळे आदी उपस्थित होते.
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “मुळशी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना विनामूल्य आरोग्यसुविधा या रुग्णालयात दिल्या जात आहेत. माझे मित्र प्रल्हाद छाब्रिया यांची आज जयंती आहे. त्यांच्या स्मरणार्थ प्रकाश आणि रितू यांनी ‘एनआयसीयू’ कक्ष अद्ययावत केला आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे लहान मुलांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांप्रती तळमळ असल्याने गेल्या २५ वर्षात रितू छाब्रिया यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.”
प्रकाश छाब्रिया यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या या पुढाकाराचे कौतुक केले. सिम्बायोसिस रुग्णालय गरिबांना चांगली आरोग्य सेवा पुरवीत असून, मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून येथील आरोग्य सुविधा आणखी अद्ययावत होतील, असा विश्वास छाब्रिया यांनी व्यक्त केला.
डॉ. राजीव येरवडेकर म्हणाले, “ग्रामीण भागातील रुग्णांसाठी असलेल्या या रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातील नवजात बालकांच्या किंवा अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण नक्कीच घटणार आहे. या पाच बेडच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात बालसंगोपनाची सेवा आम्हाला देता येईल.”
अजित व्येंकटरामन यांनी फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशन नेहमीच सामाजिक उपक्रमांत अग्रेसर राहिले असल्याचे नमूद केले. अनिल वाभी यांनीही फाउंडेशनच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. सचिन कुलकर्णी यांनी फाउंडेशनच्या कार्याविषयी माहिती दिली. डॉ. नितीन लिंगायत यांनी आभार मानले. इम्रान अली चौहान यांनी सूत्रसंचालन केले.
मुकुल माधव फाउंडेशन गेल्या २५ वर्षांपासून समाजातील गरजू घटकांसाठी, आरोग्यसुविधा व शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. सिम्बायोसिस रुग्णालयामुळे मुळशी भागातील ग्रामीण रुग्णांना उपचार मिळत आहेत. नवजात बालकांचे प्राण वाचविण्यासाठी पुण्यातील अनेक रुग्णालयांत नवजात शिशु अतिदक्षता विभागाची उभारणी करण्याचे काम सुरु आहे. आज पाच खाटा अद्ययावत झाल्या असून, लवकरच आणखी काही खाटांची उभारणी करणार आहोत.”
– रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन