डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा रामदास आठवले यांच्याकडे राजीनामा सुपूर्त; महायुतीकडून ‘आरपीआय’ला सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची खंत
पुणे: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) पुण्यातून धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमूख पदाधिकारी तथा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. डॉ. धेंडे यांनी रामदास आठवले यांच्यासह पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. महायुतीमध्ये आरपीआयला सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशी खंत त्यांनी आठवले यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. डॉ. धेंडे यांच्या या भूमिकेचा वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ. धेंडे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिलेल्या पत्रात ‘मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षामध्ये गेली २७ वर्ष कार्य करत आहे. आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासह राजकीय पदाचा उपयोग करून समाजाला न्याय देण्याच्या कामात पुढाकार घेतला आहे. पक्षाच्या धोरणानुसार विविध राजकीय भूमिकेला नेहमीच समर्थन दिलेले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून आरपीआयला महायुतीकडून सन्मानाची वागणूक दिली जात नाही. तशा भावना पदाधिकारी, कार्यकर्ते देखील बोलून दाखवत आहेत.’
नुकत्याचा पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीतही एकही जागा महायुतीने आपल्या पक्षाला दिलेली नाही. तसेच या विधानसभेमध्ये पक्षाला स्वतंत्र निवडणूक चिन्ह असूनही आपले प्रतिनिधीत्व द्यायला महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष तयार नाहीत असे दिसत आहे. सर्व आंबेडकरी जनतेमध्ये या विषयावर तीव्र नाराजीचा सूर आहे. प्रसार माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. पुणे शहरामधील अनेक कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आहे. त्यानंतर मी पक्ष सदस्त्वाचा त्याग करत आहे. माझा राजीनामा मंजूर करावा, असे या पात्रात डॉ. धेंडे यांनी केंद्रीय मंत्री आठवले यांना लिहिले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून भाजपासह महायुतीला आरपीआयने राजकीय समर्थन दिले आहे. मात्र महायुतीकडून पक्षाला केवळ गृहित धरण्याचे काम केले जात आहे. सन्मानाची वागणूक दिली जात नाही. यामुळे आंबेडकरी अनुयायी दुखावले आहेत. नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे पाठविला आहे. – डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका. |