भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम
ऍड. रमा सरोदे, विठ्ठल गायकवाड, मिलिंद अहिरे व प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान
पुणे: “राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लाडकी बहिण योजनेसह हिंदू विरुद्ध मुस्लिम असा अपप्रचार भाजपकडून केला गेला. धार्मिक द्वेष करत मतांचे ध्रुवीकरण झाल्याने निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार वाढून जातीय व धार्मिक विद्वेष वाढला आहे. अशावेळी देशाचे राजकीय आणि सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आव्हान आहे. आगामी काळात समाजातील सर्व घटक एकत्रित आणण्याची जबाबदारी ही काँग्रेसची असून, भारतीयत्वाची भावना जपण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. कुमार केतकर यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकारातून आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहामध्ये ‘माझे जीवन, माझे संविधान’ या कार्यक्रमावेळी डॉ. कुमार केतकर बोलत होते. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात मानवाधिकार कार्यकर्त्या ऍड. रमा सरोदे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, उद्योजक व आंबेडकरी कार्यकर्ते मिलिंद अहिरे व पुरोगामी विचारांना पुढे नेणारा कार्यकर्ता प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. कुमार केतकर म्हणाले, “संविधान निर्मितीसाठी घटना समिती नेमली गेली, त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. स्वातंत्र्य मिळताना धर्माच्या आधारे देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे समितीवर दबाव होता की, देश केवळ हिंदुस्थान का होऊ शकत नाही. कारण, मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार होऊन अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. तेव्हाच घटनेने हिंदुस्तान असे जाहीर केले असते, तर आजचा देश निर्माण झाला नसता. संविधानमुळे आज देश टिकलेला आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्य, काश्मीर, गोवा, पंजाब, पाँडिचेरी हे देशापासून तेव्हाच धर्माआधारे तुटले असते. ब्रिटिशांनी एकसंध भारत जिंकला नव्हता, तर आपल्या अनेक संस्थानिकांनी त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. मात्र, तत्कालीन नेत्यांच्या धोरणात्मक कार्यामुळे भारत एकसंध झाला.“फाळणीनंतर हिंसा होऊनही देश टिकला. पण आज मोठ्या प्रमाणात धार्मिक द्वेष वाढला आहे. सेक्युलर लोकांना भाजपने लक्ष्य केले. पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करून काँग्रेसवर टीका केली जाते. फाळणी, स्वातंत्र्य आणि महात्मा गांधी हत्या घटना घडल्यावर घटना समिती बैठक झाली त्यास पंडित नेहरू यांचे मार्गदर्शन होते. महात्मा गांधी यांनीच देशाचे पंतप्रधान पदासाठी नेहरू यांचे नाव सुचवले. भारताचे न झालेले पाहिले पंतप्रधान म्हणून गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नरेंद्र मोदी यांनी उभारला आहे. हिंदू राष्ट्र निर्मिती स्वप्नासाठी भाजपने सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द यांना विरोध केला. पण सर्वोच्च न्यायलयाने त्यांना फटकारले आहे. इंदिरा गांधी यांनी देशातील अशांततेची परिस्थिती खंबीरपणे सांभाळली,” असेही केतकर यांनी नमूद केले.