डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन; सामाजिक संस्थांच्या वतीने प्रतापराव पवार यांचा कृतज्ञता सन्मान

डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन; सामाजिक संस्थांच्या वतीने प्रतापराव पवार यांचा कृतज्ञता सन्मान

समाजहितैषी प्रतापरावांचे योगदान अतुलनीय, दिशादर्शक

पुणे: “पैशांची देणगी महत्वाची असतेच; पण त्यापेक्षाही वैचारिक, अनुभवाची देणगी अधिक मोलाची असते. समाजहित, दातृत्वाच्या भावनेने कार्यरत प्रतापराव पवार यांचे योगदान अतुलनीय व दिशादर्शक आहे. तंत्रज्ञानाचा सदुपयोग, वेळेचे महत्व आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

समाजहितैषी उद्योजक प्रतापराव पवार यांचा विविध सामाजिक संस्थांच्या वतीने डॉ. माशेलकर यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान करण्यात आला. विद्यार्थी साहाय्यक समितीच्या पुढाकारातून मराठवाडा मित्र मंडळ, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, स्व-रूपवर्धिनी, महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन, बाएफ, बालग्राम, बालकल्याण, वनस्थळी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडियन न्यूजपेपर सोसायटी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, गर्जे मराठी ग्लोबल, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे अंधशाळा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आदी संस्थांतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सन्मान सोहळ्याप्रसंगी या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, ‘‘पवार यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी, समृद्ध व संपन्न आहे. त्यांच्याकडे सखोल तांत्रिक ज्ञान, आधुनिक व्यवस्थापन कौशल्य, सामाजिक भान आहे. समाजातील वंचित घटकाविषयी संवेदना, स्वच्छ विचार आणि त्याला कृतिशीलतेची जोड देत पवार यांनी विविधांगी कार्य केले. त्यांनी आपल्या अनुभवाचे दान अनेक संस्थांना दिले, ते फार मोठे आहे. गेल्या ४७ वर्षांपासून त्यांचे हे काम पाहण्याचे भाग्य मला लाभत आहे.’’

सन्मानाला उत्तर देताना प्रतापराव पवार म्हणाले, “माझी आई, शाळेतील शिक्षक यांच्यासह अनेकांचे माझ्यावर संस्कार आहेत. आजचा हा पुरस्कार मी कुटुंबीय, आयुष्यात भेटलेली अनेक मोठी माणसे आणि विविध संस्थांमधील सहकारी यांना अर्पण करतो. माझे पुढील आयुष्य समाजासाठीच असेन.”

योगेश देशपांडे यांनी पवार यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. भाऊसाहेब जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *