पुणे: परमपूज्य सद्गुरू श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री देशमुख महाराज फाउंडेशन व डीएम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे. सामाजिक बांधिलकीचे व्रत, धार्मिक व अध्यात्मिक उपक्रमांतून रविवार, दि. १९ जानेवारी ते शनिवार, दि. २५ जानेवारी २०२५ या कालावधीत हा सप्ताह होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक विजय महाराज देशमुख व उपाध्यक्ष कुमारी सुवर्णा बालेघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी नरहर शिदोरे, जयमाला अनारसे, प्रतिभा साखरे, संजय देशमुख, धनश्री लोणकर, गणेश अनारसे, किरण खरात, शुभम अनारसे, मृणाल सरडे, ऋग्वेदी साखरे, अनुष्का सरडे आदी उपस्थित होते.
विजय महाराज देशमुख म्हणाले, “सद्गुरु श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीचा हा सप्ताह यंदा साधनाश्रम, गिवशी गाव, पानशेत पुणे येथे होणार आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, जप संकल्पाचे शतांश हवन, लघुरुद्र अभिषेक, संजीवनी पादुका पालखी सोहळा, पायी दिंडी, ग्रामदैवत शिरकाई देवी भेट, गुरुचरित्र पारायण, महाभोज आदी कार्यक्रम या सप्ताहात होणार आहेत. समारोपाच्या दिवशी पहाटे ६ वाजता संजीवनी पादुकांवर लघुरुद्र अभिषेक, सकाळी ७ वाजता परमपूज्य श्री गंगाधर स्वामी महाराज संजीवन पादुका पालखी सोहळा प्रारंभ होऊन ग्रामदैवत शिरकाई देवीच्या भेटीला जाईल. सकाळी ९ वाजता शिरकोली गावात भजन, रिंगण, अभिषेक व प्रसाद होईल. चूल बंद गाव जेवण महाप्रसादाने सप्ताह सोहळ्याची सांगता होईल.”
सुवर्णा बालेघाटे म्हणाल्या, “पहिल्या दिवशी ५१ लाख जप संकल्पाचे शतांश हवन होईल. त्यानंतर हभप गुरूश्री प्रिया मालवणकर यांचे गुरुचरित्रावर प्रवचन होईल. हभप वेदमूर्ती मंदार खळदकर गुरुजी यांचे सोमवारी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत नामसंकीर्तन होईल. बुधवारी सायंकाळी हभप गुरुदास श्री देशमुख महाराज यांचे ‘सद्गुरुवीण सापडेना सोय’ यावर प्रवचन होईल. भागवताचार्य हभप चंद्रकलाताई आळंदीकर, पासलकर शिक्षण संस्था दासवे येथील हभप शाम पासलकर, फलटण येथील हभप देविदास महाराज शिळीमकर यांची कीर्तनसेवा, तर गव्यसिद्ध चंद्रकांत विचारे यांचे गोमातेवर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. अखेरच्या दिवशी दत्तधाम सिंदगाव येथील बाळकृष्ण महाराज, मठाधीश महेश महाराज व प्रख्यात भविष्यवेत्ता निशांत भारद्वाज ‘देश आणि सनातन धर्म’ यावर मार्गदर्शन करतील.”