चार ज्येष्ठ तरुणांची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा

चार ज्येष्ठ तरुणांची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा

पुण्यातील दोघांचा सहभाग; ‘ग्यान की ज्योत’मधून नवीन शिक्षण धोरणाबाबत करणार जनजागृती 
पुणे: चार ज्येष्ठ नागरिक साहसी मोहिमेवर निघाले आहेत. ‘ग्यान की ज्योत’ हाती घेत काश्मीर ते कन्याकुमारी ही ३३ दिवसांची सायकल यात्रा करणार आहेत. नवीन शिक्षण धोरणाबाबत जनजागृती या सायकल यात्रेद्वारे करण्याचा त्यांचा मानस आहे. पुण्यातील दोन ज्येष्ठांचा यामध्ये सहभाग आहे. या सायकल यात्रेचा संदेश ‘वय हा सायकलिंगसाठी फक्त एक आकडा आहे’ असा आहे.
 
पुण्यातील संजय कट्टी (६५ वर्षे) आणि मोनिश चक्रवर्ती (५१ वर्षे) यांच्यासह डेहराडूनयेथील अनुभवी दाम्पत्य विश्व धीमान (७० वर्षे) आणि कमलजीत सिंग (७४ वर्षे) हे चौघे तरुण भारताच्या उत्तरेकडून श्रीनगर (काश्मीर) ते भारताच्या दक्षिणेकडे कन्याकुमारी (तामिळनाडू) असा महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक स्व-समर्थित (नो बॅकअप वाहन) ३६९९ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.
 
या चौघांनाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे विद्यार्थी गृह, अस्पायर स्किल्स, शुगर वॉलेट या संस्थांच्या, तसेच पुणेकरांच्या वतीने शनिवारी शुभेच्छा आणि पाठिंबा देण्यात आला. तसेच हे चौघे परिधान करणाऱ्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध धावपटू आशिष कसोदेकर, रिसर्च पार्क फाउंडेशनचे डॉ. अरविंद शाळीग्राम, शुगर वॉलेटचे विश्वेश कुलकर्णी, पुणे विद्यार्थी गृहाचे सुनील रेडेकर, यंग सिनिअर्सचे लोकेश मराठे, भुवनेश कुलकर्णी, डॉ. अपर्णा कुलकर्णी, विनायक माढेकर, अविनाश माढेकर, एस. ए. चव्हाण, जुगल राठी, भगवान चवले, महेश मैथिली जोग आदी उपस्थित होते.
 
 
 
२७ नोव्हेंबर २०२३ रोजी श्रीनगरमधील लाल चौक येथून हिरवा झेंडा फडकवल्यानंतर ही यात्रा दक्षिणेकडे जाईल. पुढील ३३ दिवस भारतातील ११ राज्यांमधून प्रवास करत कन्याकुमारी येथे पोहोचेल. जम्मू-कश्मीर (श्रीनगर, वैष्णोदेवी), पंजाब (अमृतसर, लुधियाना, अंबाला), हरियाणा (पानिपत), दिल्ली (नवी दिल्ली), उत्तर प्रदेश (आग्रा, मथुरा, झाशी), मध्य प्रदेश (सागर), महाराष्ट्र (नागपूर), तेलंगणा (आदिलाबाद), आंध्र प्रदेश (हैदराबाद), कर्नाटक (बेंगळुरू), तामिळनाडू (सेलम, मदुराई आणि कन्याकुमारी) या ठिकाणाहून ही यात्रा प्रवास करेल.
 
संजय कट्टी म्हणाले, “संपूर्ण भारतात सायकलिंगचा अनुभव असलेल्या महाराष्ट्र आणि उत्तराखंड (पुणे आणि डेहराडून) येथील मल्टीस्टेट टीमने ही मोहीम हाती घेतली आहे. सरासरी ६६ वर्षे वय असलेले हे पथक अशा आव्हानात्मक मोहिमेसाठी ज्येष्ठ नागरिकांमध्ये आदर्श निर्माण करणार आहे. डेहराडूनचे सायकलस्वार दाम्पत्य मोठ्या जोमाने आणि उत्साहाने काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरून करणार आहेत. दररोज सरासरी ११२ किलोमीटर सायकलिंग होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना तंदुरुस्त, आनंदी राहण्यासाठी आणि मुख्य म्हणजे जीवनाचा जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी प्रेरित करत राहण्याची आमची इच्छा आहे. तरुणांनी तंदुरुस्त, एकाग्र, आव्हाने पेलण्यासाठी आणि भारताला अभिमान वाटावा यासाठी तयार राहावे.”
 
“पश्चिमेपासून भारताच्या पूर्वेपर्यंत देशभरात ३९०० किलोमीटरच्या यशस्वी सायकलिंग राइडने आम्हाला पुढील सायकलिंग मोहिमेवर जाण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास दिला. मग आम्ही उत्तर ते दक्षिण म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी सायकल चालवायचे ठरवले,” असे मोनीश चक्रवर्ती म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *