शेखर सेन यांच्या हस्ते छाया गांगुलींचा एकाहत्तरी निमित्ताने सत्कार

शेखर सेन यांच्या हस्ते छाया गांगुलींचा एकाहत्तरी निमित्ताने सत्कार

शेखर सेन यांच्या हस्ते छाया गांगुलींचा एकाहत्तरी निमित्ताने सत्कार
संगीत साधनेत शुद्धता, एकाग्रता व निरपेक्ष भाव जपला : छाया गांगुली यांची भावना 
 
पुणे : “लहानपणापासून संगीताची आवड असल्याने संगीत साधनेकडे वळले. आकाशवाणीमध्ये कार्यरत असताना अनेक प्रतिष्ठित कलाकारांचे मार्गदर्शन सहवास लाभला. विविधभारतीवरील आरोही कार्यक्रमात, तर गमन या चित्रपटात पहिल्यांदा गायनाची संधी मिळाली. शुद्ध, एकाग्र व निरपेक्ष भाव संगीत साधना करताना जपला,” अशी भावना ज्येष्ठ गायिका छाया गांगुली यांनी व्यक्त केली.
संगीत नाटक अकादमीचे माजी अध्यक्ष शेखर सेन यांच्या हस्ते छाया गांगुली यांचा एकाहत्तरीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी गांगुली व सेन यांच्या हस्ते नाद विदूषी गुरु अन्नपूर्णा देवी यांच्या जीवनावरील सुरोपनिषद या पुस्तकाच्या बंगाली आवृत्तीचे प्रकाशन झाले. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने नवी पेठेतील पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमावेळी ज्येष्ठ बासरी वादक नित्यानंद हळदीपूर, लेखक डॉ. सुनील शास्त्री, चित्रपट संगीताचे अभ्यासक स्वप्नील पोरे, संयोजक शिरीष चिटणीस, प्रतीक प्रकाशनाचे प्रवीण जोशी आदी उपस्थित होते. उचित मीडिया या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
 
छाया गांगुली म्हणाल्या, “आकाशवाणी व दूरदर्शनमध्ये जवळपास ३६ वर्षे सेवा केली. या काळात जयदेव, मधुराणी, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, आशा, पंचम दा यांसह इतर अनेक मान्यवर कलाकारांना आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेता आले. जयदेव यांनी गायनाची संधी दिली. मधुराणी यांनी संगीताची समज वाढवली. संगीत सरिता कार्यक्रमातून अनेक सादरीकरणे करता आली. कलेचा सन्मान केला. कलेने मला सन्मान दिला.”
 
शेखर सेन म्हणाले, “महाराष्ट्र अणि बंगाल देशभक्तीची प्रेरणा देणारी ठिकाणे आहेत. संगीत क्षेत्रातील अन्नपूर्णा देवी, एम. एस. सुब्बूलक्ष्मी, लता मंगेशकर यांच्यासारखे आदर्श आमच्यासमोर आहेत. प्रत्येक व्यक्तीमधील ईश्वराची ओळख करणारी भारतीय संस्कृती आहे. अन्नपूर्णा देवी यांचे योगदान अतुलनीय असून, मला बालपणी त्यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले हे माझे भाग्य आहे. भारतीय संगीत क्षेत्राला एक वेगळा आयाम देणारे गांगुली यांचे योगदान आहे.”
 
नित्यानंद हळदीपूर म्हणाले, “अन्नपूर्णा देवी यांनी समर्पण भावनेने कलेची सेवा केली. त्यांचे समृद्ध संगीत अनुभवले. संगीत ही एक साधना आहे. गांगुली यांनी अनेक अजरामर गाणी गायली. आजही त्यांची अनेक गाणी रसिकांच्या तोंडी आहेत.”
 
डॉ. सुनील शास्त्री म्हणाले, “प्रतिभावान अन्नपूर्णा देवी यांच्या जीवनाचा पट मांडण्याचा अनुभव घेता आला. मूळ गुजरातीत असलेले हे चरित्र आता मराठी, हिंदी, इंग्रजी आणि आता बंगाली अशा पाच भाषांत आले आहे.”

स्वप्नील पोरे म्हणाले, “गांगुली यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा, या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजिला. त्यांनी प्रसारभारती, तसेच अनेक अजरामर गाण्यांतून आपली संगीत कारकीर्द दिमाखात घडवली.”
 
शिरीष चिटणीस यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कृपाशंकर शर्मा यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *