पुणे : सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७२ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि. २ एप्रिल) हा महोत्सव अल्पबचत भवन, क्वीन्स गार्डन रोड, रेसिडेन्सी क्लबजवळ, कौन्सिल हॉल, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी व दीपक वाधवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सिंधू सेवा दलाचे सचिव सचिन तलरेजा, जनसंपर्क अधिकारी किरण फेरवानी आदी उपस्थित होते.
सुरेश जेठवानी म्हणाले, “दरवर्षी भगवान साई झुलेलाल यांची भव्य मिरवणूक व रथयात्रा निघते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही रथयात्रा रद्द करण्यात आली आहे. शनिवारी (२ एप्रिल) सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होईल. सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानी यांच्या नेतृत्वात मंजुश्री आसुदानी, शुभम नाथानी, अशोक सुंदरानी, करण खेमानी आदी कलाकार कार्यक्रम सादर करणार आहेत. जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर प्रीतिभोज (महाप्रसाद) कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील तीन ते चार हजार अधिक सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी होतील.”
“या कार्यक्रमात सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष पीटर दलवानी, बांधकाम व्यावसायिक राजीव कृष्णांनी, परमानंद जमतानी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. सिंधू सेवा दल गेली ३२ वर्ष कार्यरत आहे,” असे दीपक वाधवानी यांनी नमूद केले.