डॉ. आनंद देशपांडे यांचे मत; ‘आयसीएआय’तर्फे दोन दिवसीय ३६ व्या विभागीय परिषदेचे उद्घाटन
पुणे : “तंत्रज्ञानाच्या अंतर्भावाने झपाट्याने काळ बदलत आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलत्या आणि स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी सनदी लेखापालांनी स्वतःला सक्षम व ‘अपग्रेड’ करत राहिले पाहिजे,” असे मत पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक व मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी व्यक्त केले. सनदी लेखापालांनी जबाबदारीचे भान, शिकण्याची वृत्ती, योग्य मार्गदर्शन व जनसंपर्क आणि उद्योगाभिमुख दृष्टीकोन ही चतुःसुत्री आचरणात आणावी, असा कानमंत्रही डॉ. आनंद देशपांडे यांनी दिला.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलतर्फे (डब्ल्यूआयआरसी) आयोजित दोन दिवसीय ३६ व्या विभागीय परिषदेचे (रिजनल कॉन्फरन्स) उद्घाटन डॉ. आनंद देशपांडे यांच्या हस्ते झाले. प्रथमच पुण्यात होत असलेल्या या परिषदेची संकल्पना ‘भविष्यासाठी सज्ज सीए’ अशी होती. बाणेर येथील बनतारा भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ‘आयसीएआय’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिकेत तलाठी, माजी अध्यक्ष अमरजित चोप्रा, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘डब्ल्यूआयआरसी’चे अध्यक्ष सीए मुर्तुझा काचवाला,उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, ‘डब्ल्यूआयआरसी’च्या सचिव सीए श्वेता जैन, विभागीय समिती सदस्या सीए ऋता चितळे, सीए अर्पित काबरा, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, उपाध्यक्ष सीए राजेश अग्रवाल आदी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
डॉ. आनंद देशपांडे म्हणाले, “आपल्या कृतीत, निर्णयप्रक्रियेत आणि करिअरमध्ये आपण जबाबदारी घ्यायला हवी. त्याला नियोजनाची जोड हवी. काळ वेगाने बदलतोय, नवनवीन तंत्रज्ञान येत आहेत. त्यामुळे स्वतःला अद्ययावत (अपग्रेड) ठेवण्यासाठी सतत शिकत राहावे. उद्योगाभिमुख दृष्टीकोनातून जनसंपर्क वाढवला, तर यशस्वीपणे वाटचाल करता येऊ शकेल. सनदी लेखापालांनी उद्योगांना, सामान्य करदात्यांना आर्थिक शिस्त लावण्याचे काम करावे.”
सीए अनिकेत तलाठी म्हणाले, “भविष्यातील आव्हाने ओळखून त्यानुसार सीए अभ्यासक्रमातही आवश्यक ते बदल होत आहेत. कौशल्य आणि उद्योगाभिमुख सनदी लेखापाल तयार व्हावेत, यावर भर दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींचा वेध घेत, सीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात नवनव्या गोष्टींचा अंतर्भाव केला जात आहे. विद्यार्थ्यांची, सनदी लेखापालांची क्षमता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.”
सीए अमरजित चोप्रा म्हणाले, “व्यवसायाचे नियमन अधिकाधिक कठीण होत असताना, विविध भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नैतिक आचरण आवश्यक आहे. विविध भागधारकांना वेळेत जागे करण्यासाठी सनदी लेखापालां ‘वॉचडॉग’ची भूमिका पार पाडावी लागेल. चार्टर्ड अकाउंटंट्स यापुढे अकाउंटंट,ऑडिटर किंवा कर सल्लागार म्हणून पाहिले जात नाहीत, तर सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून पाहिले जातात.”
सीए मुर्तझा काचवाला म्हणाले, “या परिषदेत महाराष्ट्रासह गोवा, गुजरात येथून सुमारे १००० सीए सभासदांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, याचा आनंद आहे. कोरोनानंतर बदलेले स्वरूप, सीए क्षेत्रात झालेला तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, कर रचनेतील बदल आदी गोष्टी समजून घेण्यासाठी ही परिषद एक महत्वाचे व्यासपीठ आहे. त्याचबरोबर सनदी लेखापालांना येथे एकमेकांशी जोडण्याची संधी मिळते. ज्ञानाचे आदानप्रदान होते.”
‘सद्यस्थितीत जागतिक स्तरावर भारताला असलेल्या संधी’ यावर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. अजित रानडे मार्गदर्शन केले. ‘भविष्यासाठी आपण सज्ज आहोत का?’ आणि ‘चौकटीबाहेरचा विचार : संधींचे भांडार’ या विषयावर चर्चासत्र झाले. उद्योग व सनदी लेखापाल क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचार मांडले. सनदी लेखापाल क्षेत्रातील नवतंत्रज्ञान, विविध प्रणाली, त्याचे स्वरूप आदींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
सूत्रसंचालन सीए अमृता पानसे यांनी सूत्रसंचालन केले. सीए अर्पित काबरा प्रास्ताविक केले. सीए यशवंत कासार यांनी आभार मानले.