कॅन्सरवरील उपचार मोफत आणि सवलतीच्या दरात उपलब्ध; उमेश चव्हाण
पुणे: बदलत्या पर्यावरणीय परिस्थिती आणि अस्वाभाविक जीवनशैलीमुळे महाराष्ट्रातील कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महागड्या उपचारांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून कर्जाच्या खाईत लोटली जात आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने ‘कॅन्सर मुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवले जात आहे. या मोहिमेंतर्गत कॅन्सरवरील महागडे उपचार मोफत किंवा सवलतीच्या दरात दिले जातील, अशी माहिती कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख आणि रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस यूनिव्हर्सल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्मिता भोयर, होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटरचे मुख्य संचालक डॉ. अमोल देवळेकर, रुग्ण हक्क परिषदेचे केंद्रीय सल्लागार आणि माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, पुणे शहराध्यक्षा अपर्णा मारणे साठे आणि अमोल हुलावळे हेही उपस्थित होते.
उमेश चव्हाण म्हणाले, “सध्या महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तोंड, जीभ, रक्त, मेंदू, अंडाशय आणि त्वचेचा कॅन्सरही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. पुण्यात लाखो रुग्ण कॅन्सरवर उपचार घेत आहेत. मात्र, या उपचारांसाठी मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. अनेक कुटुंबांना गाड्या, दागिने, घर विकून उपचार करावे लागत आहेत. ही परिस्थिती पाहता आम्ही कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केले आहे.”
चव्हाण पुढे म्हणाले, “कॅन्सरवरील कीमोथेरेपी, इम्युनोथेरेपी, शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि आवश्यक औषधांची किंमत लाखोंपर्यंत जाते. सामान्य माणसाला हे उपचार परवडणे अशक्य आहे. म्हणून या मोहिमेंतर्गत कीमोथेरेपी आणि शस्त्रक्रिया सरकारी योजनांद्वारे पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. पुण्यात शनिवारवाड्याजवळील यूनिव्हर्सल हॉस्पिटल आणि नाना पेठेतील होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर येथे हे उपचार उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी 9850002207 या क्रमांकावर संपर्क साधावा.”