Post Views: 122
‘रिपेअरिंग कॅपिटल’ होण्याकडे भारताची वाटचाल : डॉ. संजय गांधी
एस्टोअर स्टार्टअप द्वारे युवकांना व्यवसायाची संधी : डॉ. अरविंद शाळिग्राम
पुणे : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जगभर ठोस पावले उचलली जात आहेत, भारतही मागे नाही. जगाचे ‘रिपेअरिंग कॅपिटल’ (देखभाल आणि दुरुस्तीची जागतिक केंद्र) बनण्याच्या दृष्टीने देशाने पावले टाकली आहेत, असे प्रतिपादन अस्पायर नॉलेज अँड स्किल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय गांधी यांनी केले.
स्किल इंडिया उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशन व अस्पायर-नॉलेज अँड स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने एस्टोअर स्टार्टअपचे लोकार्पण नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते. एसीपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, अस्पायर नॉलेज अँड स्किल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय गांधी, प्रादेशिक तंत्र शिक्षण कार्यालयाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, भुवनेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
डॉ. संजय गांधी पुढे म्हणाले, “देखभाल आणि दुरुस्तीची सेवा क्षेत्रात यापुढे संघटितपणा येणार आहे. भारत सरकारने त्यादृष्टीने धोरण आखणी सुरू केली आहे. या क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध होणार आहेत. ही बदलाची दिशा ओळखून, त्याचा युवा पिढीने लाभ घ्यावा. कारण दुरुस्तीची जागतिक बाजारपेठ सुमारे १०० अब्ज डॉलर्सची आहे. देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याकडून ‘रिपेअर आऊटसोर्सिंग’ धोरण आखण्यात येत आहे. त्यामुळे प्रारंभिक टप्प्यात किमान २० टक्के बाजारपेठेवर ताबा मिळवता येईल, अशी आशा आहे.”
डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले, “रिसर्च पार्क फाउंडेशन स्टार्टअपना प्रोत्साहन देण्याचे काम करते. गेल्या चार वर्षात अनेक स्टार्टअप उभे राहिले आहेत. आपल्याकडे चांगली शिक्षण व्यवस्था आहे. बहुशाखीय, आंतरशाखीय शिक्षण घेता येते. फक्त शिक्षण आणि प्रात्यक्षिक काम यातील दरी कमी होण्याची गरज आहे. पदव्युत्तर पदवी, संशोधनात्मक शिक्षण प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरेल. इलेक्ट्रॉनिक गॅजेट दुरुस्तीचे कौशल्य आपण शिकून घ्यायला हवीत. कौशल्य विकासाचे केवळ प्रमाणपत्र घेऊन उपयोग नाही, तर क्षमता विकसित होणे गरजेचे आहे. तरुणांसमोर इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंग व्यावसायाचे मॉडेल उभे करण्याच्या दृष्टीने विद्यापीठात हे एस्टोअर रिपेअरिंग स्टुडिओ सुरू करण्यात आला आहे. सर्व महाविद्यालयासाठी देखील ही सुसंधी आहे”
डॉ. जाधव यांनी आपल्या भाषणात तंत्रज्ञान स्टार्टअप्सवर भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस्टोअरच्या प्रमुख समिधा गांधी यांनी केले. यावेळी पुण्यातील प्रमुख ५० महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. युवकांना ‘यूझ अँड थ्रो कल्चर’पासून परावृत्त करून, उद्योजकते वळवण्यासाठी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, अशा प्रतिक्रिया या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.