‘आयसीएआय’कडून आयोजित शिबिरात २२५ जणांचे रक्तदान

‘आयसीएआय’कडून आयोजित शिबिरात २२५ जणांचे रक्तदान

पुणे : सनदी लेखापाल (सीए) दिवसानिमित्त दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंटस स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या वतीने सीए सप्ताह साजरा झाला. या सप्ताहाअंतर्गत तळजाई टेकडीवर वृक्षारोपण, पाच ठिकाणी रक्तदान शिबीर, कात्रज येथील अनाथालयात शालेय साहित्याचे वाटप, निवारा वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले. पाच ठिकाणी आयोजिलेल्या शिबिरात एकूण २२५ जणांनी रक्तदान केले.
                                        
 
‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम झाले. पुणे शाखेचे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशीनाथ पठारे, ‘विकासा’चे उपाध्यक्ष अथर्व खुर्द, सदस्य प्राची शर्मा, कार्यालयीन व्यवस्थापक दीपक कोरगावकर आदी उपस्थित होते. ‘तळजाई’वर पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा नगरसेविका अश्विनी कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन ‘आयसीएआय’च्या वतीने १ ते ३ जुलै या तीन दिवशी शहराच्या विविध भागात पाच ठिकाणी आयोजिलेल्या रक्तदान शिबीरात २२५ बाटल्या रक्त संकलित झाले. 
 
एक जुलैला एसपीसीएम, सेंट्रल पॉईंट, मित्र मंडळ, पर्वती येथे पुणे सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट रक्तपेढीच्या सहकार्याने ६८ लोकांनी रक्तदान केले. दोन जुलैला इंटरलिंक कॅपिटल अड्वायझर्स, केके मार्केट, पुणे सातारा रस्ता येथे आचार्य आनंदऋषीजी पुणे रक्तपेढीच्या सहकार्याने ३६ लोकांनी रक्तदान केले. तर तीन जुलैला आयसीएआय भवन, बिबवेवाडी येथे केईएम रक्तपेढीच्या सहकार्याने १७, डीएमकेएच, फॉरचुन हाऊस, बाणेर-पाषाण लिंक रस्ता येथे डॉ. डी. वाय. पाटील ब्लड बँक पिंपरी चिंचवड यांच्या सहकार्याने ३९ आणि राठी अँड राठी कंपनी, कमल कीर्ती, सिंहगड रस्ता येथे पूना हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या सहकार्याने ६५ लोकांनी रक्तदान केले. सीए सुहास बोरा, सीए मोहित अगरवाल, सीए दिनेश मुंदडा, सीए शैलेंद्र पवार, सीए शैलेश राठी, सीए पराग राठी, सीए विक्रांत साळुंके, सीए निलेश देशमुख यांनी यामध्ये पुढाकार घेतला.
 
सीए समीर लड्डा म्हणाले, “कोरोनामुळे सध्या अनेक रुग्णालयांना रक्ताचा पुरवठा आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे सीए दिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आली. सर्व सीए सभासद, विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. वृक्षारोपण व अन्य उपक्रमही यशस्वीपणे पार पडले. येत्या ७ जुलैला मधुरा दातार व सहकाऱ्यांचा ‘एक सुनहेरी शाम सीए दिन के नाम’ हा सुरमधुर गायनाचा कार्यक्रम होणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *