भारत व दक्षिण कोरिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना ५० वर्ष पूर्ण

भारत व दक्षिण कोरिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना ५० वर्ष पूर्ण

इंडो-कोरियन सेंटर, किंग सेजोंग इन्स्टिट्यूट पुणेतर्फे दोन दिवसीय महोत्सवातून दोन्ही देशांच्या कला व संस्कृतीचे दर्शन
पुणे : 
 
आंतराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव व कला आणि संस्कृतीच्या उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी, तसेच नैसर्गिक वनस्पती व जीवजंतूंच्या अधिवासासाठी प्रसिद्ध नमी इस्लैंड स्थित नमी इस्लैंड आर्ट्स एंड एज्युकेशनशी (एनएई) सामंजस्य करार करण्यात आला. नुकताच नमी इस्लैंड येथे कलाकार शिबीर आयोजिले होते. त्यात दोन्ही देशांतील दहा कलाकार सहभागी झाले होते. ‘टागोर अँड नेचर – अ रिव्हर’ या संकल्पनेवर चित्रे रेखाटली. या चित्रांतून दोन्ही देशांतील ५० वर्षांच्या संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला. ही चित्रे प्रदर्शनासाठी भारतात आणली असून, त्याचे प्रदर्शन बालेवाडी येथील इंडो-कोरियन सेंटरमध्ये आयोजित केले होते. कोरियन भाषा शिकणाऱ्या नृत्यांगना मनमोहक सादरीकरण केले. ‘कोरिया-भारत संबंध दृढ करण्यात आपली भूमिका’ यावर अनेकांनी विचार मांडले. कोरियन भाषा व संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी एक चित्ररथ पुण्याच्या विविध भागात फिरवण्यात आला. शनिवारवाडा, फिनिक्स मॉल येथे ‘एल्डोरॅडो’ नाट्याचे, तसेच नृत्याविष्कारांचे सादरीकरण झाले.
 
इंडो-कोरियन सेंटर येथील किंग सेजोंग इन्स्टिट्यूट पुणे येथे चित्र प्रदर्शन, नृत्य, गायन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रसंगी किंग सेजोंग इन्स्टिट्यूट पुणेच्या संचालिका डॉ. एउन्जु लिम, इंडो-कोरियन सेंटरचे सहसंस्थापक संजीब घटक, कोरियन प्राध्यापक सनयंग यौन, नमी इस्लैंड आर्ट्स एंड एज्युकेशनचे प्रमुख जीनवुक अल्बर्ट, मुख्य कार्यकारी अधिकरी केयॉन्गवू मिन, क्युरेटर सुजिन किम, प्रकल्प व्यवस्थापक ह्येमीन शिन यांच्यासह दोन्ही देशांतील विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. एउन्जु लिम म्हणाल्या, “भारत व दक्षिण कोरिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध १९७३ मध्ये सुरु झाले. राजकारण, अर्थव्यवस्था, संस्कृती व शिक्षण या क्षेत्रासह अन्य क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाली. त्यातून विकासाचे नवे पर्व सुरु झाले. दोन्ही देशांतील लोकांप्रती आदरभाव आहे. विविध उपक्रम, महोत्सव व शिक्षण क्षेत्रातील आदानप्रदान या संबंधांना आणखीन मजबूत करत आहे.”
 

किंग सेजोंग इन्स्टिट्यूटविषयी :
भारतीय आणि कोरियन लोकांना एका व्यासपीठावर आणून त्यांना आदानप्रदानाची संधी देण्याच्या उद्देशाने स्थापित युथबिल्ड फाउंडेशन येथे इंडो कोरियन सेंटरची (आयकेसी) स्थापना झाली आहे. कोरियाच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत जुलै २०२३ मध्ये या केंद्राला किंग सेजोंग इन्स्टिट्यूट पुणे सुरु करण्यास मान्यता मिळाली. या इन्स्टिट्यूटमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरियन भाषेचे विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. तसेच कॉर्पोरेट नोकरदारांसाठी कोरियन भाषा आणि संस्कृतीचे प्रशिक्षण पुरविण्यात येणार आहे. मूळ कोरियन शिक्षकांकडून हे वर्ग आयोजित केले जातील. यामध्ये कोरियन भाषा आणि संस्कृतीच्या प्रशिक्षणासाठी सर्व आधुनिक सुविधा असतील. ज्यामध्ये स्मार्ट कलासरूम, मनोरंजन क्षेत्र, साहाय्य कक्ष, ग्रंथालय, कॅफेटेरिया आदींचा समावेश आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *