अक्षय जैन यांची माहिती; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीमुळे शाळांना सुट्टी देण्याला आक्षेप
पुणे : युवकांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासह देशातील घटनात्मक व लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि लोकशाहीची मुळे अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय युवक काँग्रेसतर्फे ‘भारत जोडो लीडरशिप प्रोग्राम’ सुरू करण्यात आला आहे,” अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मीडिया सेलचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव वैष्णवी किराड, पुणे शहर अध्यक्ष राहुल शिरसाट, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कौस्तुभ नवले, जिल्हा अध्यक्ष महेश टापरे आदी उपस्थित होते. यावेळी ‘भारत जोडो लीडरशिप प्रोग्राम’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
अक्षय जैन म्हणाले, “या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाची लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या, देश समजून घेण्यासाठी तळागाळातून येऊन युवक काँग्रेसमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या तरुणांपर्यंत पोहोचणे, हा यामागचा उद्देश आहे. ‘भारत जोडो’ यात्रेच्या एका वर्षाच्या प्रवासाची उद्दिष्ट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी हा नेतृत्व कार्यक्रम महत्वाचा आहे. भारत जोडो नेतृत्व कार्यक्रम हा भारतीय युवक काँग्रेसचा नवीन उपक्रम आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन देशातील तरुणांनी स्वतःला राजकीयदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, तसेच आपल्या भविष्यासाठी अधिक चांगली धोरणे तयार करण्यात योगदान द्यावे. जिथे इतर पक्षांचे नेते द्वेषाची बीजे पेरतात, तिथे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आपण शांततेचे रोप लावतोय.”
“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सक्रियपणे सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सामावून घेण्यासाठी हा उपक्रम आहे. ज्या युवकांना लोकसभा निवडणुकीत काम करायचे आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. २०२४ च्या निकालांवर या अशा पद्धतीने युवकांचा सहभाग नक्कीच बदल घडवेल. तरुणांना आणि विद्यार्थ्यांना एका छताखाली एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम असणार आहे.”
संघाच्या बैठकीसाठी शाळा बंद ठेवण्यावर आक्षेप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची तीन दिवसीय समन्वय बैठक पुण्यात होत आहे. या बैठकीला आमची हरकत नाही. मात्र, बैठकीसाठी दोन शाळा आणि एक महाविद्यालय तीन दिवसांकरिता बंद ठेवून विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा प्रकार गंभीर आहे. यांची शाळा भरवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्टी देणे आक्षेपार्ह आहे. तीन दिवस विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडणार आहे. त्यामुळे अशा बैठकीला परवानगी देऊन शाळेला सुट्टी कशी दिली, याचा जाब आम्ही शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेला, तसेच शिक्षण विभागाला विचारणार आहोत, असे अक्षय जैन यांनी यावेळी सांगितले.