कर्करोगावर आयुर्वेदिक रसायन उपचारपद्धती उपयुक्त

कर्करोगावर आयुर्वेदिक रसायन उपचारपद्धती उपयुक्त

पुणे : कर्करोगावर आयुर्वेद रसायन उपचार पद्धती फायदेशीर ठरत असून, त्यामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांवरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. पुण्यातील वैद्य योगेश बेंडाळे यांनी रसायु कॅन्सर क्लिनिकच्या माध्यमातून आयुर्वेदिक रसायन उपचारपद्धतीच्या परिणामकारकतेविषयी संशोधन केले आहे. कर्करोगाने ग्रस्त रुग्णावरील उपचारांमध्ये या पद्धतीचा सहायक आणि पर्यायी उपचारपद्धती म्हणून विचार केला जाऊ शकतो, असा निष्कर्ष वैद्य बेंडाळे यांनी संशोधनातून सिद्ध केला आहे.

‘रियल वर्ल्ड इव्हिडन्स (आरडब्लूई) ऑन सेफ्टी अँड एफिकसी ऑफ हर्बो मिनरल रसायन थेरपी ऑन ओव्हरऑल सर्व्हायव्हल (ओएस) अँड पेशंट रिपोर्टेड आउटकम (पीआरओ) मेजर्स इन जेरिएट्रिक कॅन्सर पेशंट्स’ (हर्बो-मिनरल रसायन उपचार पद्धतीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे वास्तव जगातील पुरावे आणि वयोवृद्ध कर्करोग ग्रस्तांवरील उपचारांचे रुग्णांनी नोंदवलेले परिणाम) या विषयावर वैद्य बेंडाळे यांनी कॅनडा येथे नुकत्याच झालेल्या ‘एमएएससीसी-आयएसओओ-२०२१’ परिषदेमध्ये संशोधन प्रबंध सादर केला आहे. रसायु कॅन्सर क्लिनिकचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) वैद्य योगेश बेंडाळे यांच्यासह वैद्य विनीता बेंडाळे, वैद्य पूनम बिरारी, वैद्य अविनाश कदम, वैद्य आनंदराव पाटील आणि वैद्य वैशाली पाटील यांनी संशोधन प्रबंधनाचे सहलेखन केले आहे.

कॅनडातील ‘दि मल्टिनॅशनल असोसिएशन ऑफ सपोर्टिव्ह केअर इन कॅन्सर (एमएएससीसी) ही एक आंतरराष्ट्रीय बहुशाखीय संस्था असून, ७० हून अधिक देशांमध्ये तिचे सदस्य आहेत. कर्करोगाच्या कोणत्याही स्तरावर असलेल्या रुग्णांकरीता सहायक उपचारपद्धतींविषयीच्या सर्व पैलूंवर शिक्षण व संशोधन करण्यास ही संस्था समर्पित आहे. दरवर्षी एमएएससीसी आणि इंटरनॅशनल सोसायटी फॉर ओरल आँकॉलॉजी (आयएसओओ) यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक परिषद आयोजित करण्यात येते. ७० देशांमधून १६०० हून अधिक जण सहभागी होतात.

या संशोधनाविषयी अधिक माहिती देताना डॉ. बेंडाळे म्हणाले, “कर्करोगविरोधी पारंपरिक उपचारपद्धतींसोबत आयुर्वेद रसायन उपचारपद्धती अवलंबता येत असल्याचे या संशोधनाच्या निष्कर्षांनी सूचित केले आहे. आयुर्वेद रसायन उपचारपद्धती ही रुग्णांना किमोथेरपी सहन करण्यास आणि किमान विपरित परिणामांसह किमोथेरपीची विहित प्रक्रिया पूर्ण करण्यास चांगल्याप्रकारे मदत करते. पर्यायाने ही उपचारपद्धती कर्करोग ग्रस्तांना वेदनारहितपणे विकाराशी लढण्यास सहाय्यभूत ठरते. यातूनच आयुर्वेद आणि कर्करोगविषयक पारंपरिक उपचारपद्धती यांच्या एकत्रिकरणाची, तसेच इंटिग्रेटिव्ह आँकॉलॉजीमध्ये अधिक संशोधनाची गरज निर्माण होते.”

“गंभीर कर्करोगग्रस्त वृद्धांमध्ये रसायन उपचारपद्धतीमुळे अनुकूल प्रतिसाद दिसून येत असल्याचे निरीक्षण या संशोधनामध्ये नोंदवण्यात आले. त्याचप्रमाणे, जे रुग्ण पारंपरिक कर्करोगविरोधी उपचारांसाठी पात्र नाहीत, किंवा त्या उपचारांना आता प्रतिसाद देत नाहीत, अशा रुग्णांमध्ये आरोग्याशी संबंधित जीवनदर्जा आणि त्यांच्या शारीरिक हालचाली कायम राखण्याची क्षमता या उपचारपद्धतीमध्ये असल्याचे संशोधनात दिसून आले. या संशोधनाचे निष्कर्ष हे वृद्ध लोकसंख्येवरील आयुर्वेदिक कर्करोग उपचारपद्धतींच्या वास्तव जगातील पुराव्यांवर आधारित आहेत. सर्व प्रकारचे कर्करोग आणि सर्व वयोगटांतील रुग्णांना होणारे रसायन उपचार पद्धतींचे लाभ निश्चित करण्यासाठी अधिक व्यापक स्तरावर संशोधन हाती घेण्याचे ठरवले आहे,” असेही वैद्य बेंडाळे यांनी नमूद केले.

मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, स्मृतिभ्रंश, मूत्रपिंड वा यकृतासंबंधीचे विकार यामुळे वृद्ध रुग्णांवर कर्करोग उपचार अधिक आव्हानात्मक, गुंतागुंतीचे ठरतात. वयामुळे किमोथेरपीची विपरितता आणि घटणारी सहनशीलता याचाही धोका असतो. अशावेळी आयुर्वेदातील उपचार उपयुक्त ठरतात. सहायक आणि पर्यायी उपचारपद्धतींच्या (कॅम) किंवा इंटिग्रेटिव्ह आँकॉलॉजीच्या (समावेशक कर्करोगोपचार शास्त्र) लाभांचे मूल्यमापन करणारी कोणतीही पद्धतशीर आकडेवारी उपलब्ध नव्हती. म्हणूनच, रसायु कॅन्सर क्लिनिकने गंभीर कर्करोगग्रस्त वृद्ध रुग्णांबाबत हे संशोधन हाती घेतले. आतडे, अन्ननलिका, स्वादुपिंड, स्तन, मूत्राशय कर्करोग रुग्णांवर आयुर्वेद रसायन उपचार पद्धतीची सुरक्षितता आणि परिणामकारकता अभ्यासण्यात आली असल्याचे वैद्य बेंडाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *