पुणे : औंध येथे होणाऱ्या आठव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका डॉ. माधवी खरात यांची, तर स्वागताध्यक्षपदी माजी आमदार साहित्यिक अॅड. राम कांडगे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या वतीने ऑगस्ट महिन्यात क्रांतीदिनी (९ ऑगस्ट) हे संमलेन होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य व संमेलनाचे निमंत्रक डॉ. अरुण आंधळे यांनी दिली.
डॉ. खरात या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याच्या अभ्यासक आहे. मैत्र, पत्रांच्या अंतरंगातून बाबासाहेब आंबेडकर, दलित लेखिकांचे लेखन, डॉ. आंबेडकरांचा धम्मविषयक पत्रव्यवहार आदी साहित्यकृती डॉ. खरात यांच्या नावावर आहेत. कोरोना संबंधित सर्व नियम पाळून निवडक लोकांच्या उपस्थितीत हे संमेलन होणार असल्याचे डॉ. आंधळे यांनी सांगितले. संमेलनाच्या तयारीसाठी प्रा. डॉ. संजय नगरकर आणि प्रा. प्रशांत रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.