पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातप्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआयए) व रिलायन्स इन्फ्रा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे. ‘मनसे’च्या रस्ते, वाहतूक व आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांनी रिलायन्स आणि एनएचआयए यांच्या हलगर्जीपणामुळेच या दोन निष्पाप महिलांचा बळी गेल्याचा आरोप करत पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष प्रविण आग्रे, हवेली तालुका अध्यक्ष ईश्वर घोगरे, गणेश पवार व महाराष्ट्र सैनिक हजर होते.
गुरुवारी नवले पुलाजवळील सेल्फी पॉईंट येथे भीषण अपघात होऊन दोन महिला जागीच ठार झाल्या होत्या, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. या महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, अनेक ठिकाणी खचलेला रस्ता आणि अर्धवट कामे यामुळे हा महामार्ग अपघातांचे केंद्र बनला आहे. अनेकदा अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव जात आहेत. या दोन्ही संस्थांकडे वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, अशा घटना वाढत आहेत. कात्रज बोगद्यापासून नऱ्हेपर्यंत तीव्र उतार असल्याने रबरी रिफ्लेक्टर लावण्याची गरज आहे. जेणेकरून वाहनचालकांचा वेग कमी होईल आणि अपघात घडणार नाहीत, असे जगदीश वाल्हेकर यांनी नमूद केले.