चित्रा नायर यांची माहिती; ‘पीसीआरए’, पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाचा पुढाकार
पुणे : स्वच्छ, सुरक्षित व हरित ऊर्जा, शाश्वत विकास आणि आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सक्षम-२०२२ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला आहे. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (पीसीआरए), पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयक यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्यासंबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने आणि पाठिंब्याने हे अभियान राबवले जात आहे, अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) च्या जिल्हा नोडल अधिकारी व सिनिअर एरिया सेल्स मॅनेजर चित्रा नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (एआयपीडीए) प्रवक्ते अली दारूवाला उपस्थित होते.
जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष्य असल्याचे नायर यांनी सांगितले. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (पीसीआरए) पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनाचे जनजागृती करण्यासाठी, इंधन-कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनाचे धोरण आणि रणनीतीचा प्रस्ताव ठेऊन, सरकारला मदत करण्यासाठी अग्रणीय आहे. तसेच, या कालावधीत संपूर्ण देशात सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) २०२२ चे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण भारतात ‘आझादी का अमृत महोत्सव थ्रू ग्रीन अँड क्लीन एनर्जी’ असे घोषवाक्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य सक्षम-२०२२ चे उद्घाटन नुकतेच मुंबई येथे महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक रवी पीएस, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी, अर्जुन पुरस्कारप्राप्त माया मेहेर, हिंदुस्थान पेट्रोलियमचे पश्चिम क्षेत्र मुख्य महाव्यवस्थापक ध्रुव कपिल आदी उपस्थित होते.
या जनजागृती अभियानांतर्गत ‘रांगोळी स्पर्धा, शालेय विद्यार्थी/शिक्षकांसाठी ‘प्रश्नमंजुषा’ स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद, महाविद्यालयांमध्ये भित्तीचित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, वर्तमानपत्र व टीव्ही, रेडिओवर प्रसिद्धी आणि टॉक शो अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सक्षम-२०२२ दरम्यान महाराष्ट्र राज्यात सुमारे १६ प्रकारचे ८०० उपक्रम आयोजित केले आहेत, असे नायर यांनी नमूद केले.