प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सातव्या इंडस्ट्री-अकॅडेमिया इंटेग्रेशन कॉन्क्लेव्ह २०२४ मध्ये मार्गदर्शन
फेडरेशन फॉर वर्ल्ड अकॅडमिक्सतर्फे यांना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया ‘आदर्श उच्च शिक्षण प्रचारक’ पुरस्कार प्रदान
पुणे: “आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ‘धर्मस्य मूलम् अर्थः’ म्हणजेच अर्थव्यवस्था हीच आपली शक्ती असे म्हटले आहे. त्यामुळे सामाजिक स्थैर्यासाठी नैतिक मूल्यांची जोड असलेली सक्षम अर्थव्यवस्था गरजेची असते,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
फेडरेशन फॉर वर्ल्ड अकॅडमिक्स आणि ईपीएन-एज्युकेशन पोस्ट न्यूज यांच्या वतीने आयोजित सातव्या इंडस्ट्री-अकॅडेमिया इंटेग्रेशन कॉन्क्लेव्ह २०२४ मध्ये विशेष अतिथी वक्ता म्हणून प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना निमंत्रित करण्यात आले होते. नवी दिल्ली येथील हॉटेल हयात येथे नुकतीच ही परिषद पार पडली. नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम, तसेच ‘नॅक’ व ‘एनबीए’ या संस्थांचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले.
“रोजगाराच्या संधी आणि क्षमतावर्धन’ या संकल्पनेवर आधारित ही इंडस्ट्री-अकॅडेमिया कॉन्क्लेव्ह आयोजिली होती. भारतातील रोजगारक्षमता वाढवण्याच्या प्रमुख आव्हानांवर यामध्ये चर्चा झाली. रोजगार क्षमतेला चालना देण्यासह भविष्यातील संधींचा लाभ घेण्यासाठी तरुणांना सुसज्ज करण्याच्या नाविन्यपूर्ण उपायांवर चर्चा झाली. शिक्षण व उद्योग क्षेत्रातील २०० हून अधिक प्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘आदर्श उच्च शिक्षण प्रचारक’ (एक्झेम्प्लेरी हायर एज्युकेशन एवान्जेलिस्ट) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ‘भारताच्या लोकसांख्यिक लाभाचा उपयोग: वर्तमान आणि भविष्य दृष्टिकोन’ या विषयावरील चर्चासत्रात प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, हैदराबाद येथील मल्ला रेड्डी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्हीएसके रेड्डी, नवी मुंबईतील डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. वंदना मिश्रा चतुर्वेदी, आयएफएचई बंगलोरचे कुलगुरू प्रा. मुद्दू विनय, झारखंड येथील आयसीएफएआय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रमन झा, कानपूर येथील हार्कोर्ट बटलर टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. समशेर आदी सहभागी झाले होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “भारतात ५० टक्के लोकसंख्या तरुण आहे. २५ वर्षाच्या आतील तरुणांची संख्या मोठी आहे. भारताला आपली आर्थिक ताकद वाढवण्यासाठी पुढील काळात याचा लाभ होईल. या तरुणाईची कार्यक्षमता वाढवून त्यांच्या कौशल्याचा योग्य उपयोग केला, तर भारत अग्रस्थानी झेपावू शकतो. भारतीयांवर तंत्रज्ञान, आर्थिक वाढ आणि हिंदु धर्मात रुजलेली आध्यात्मिक मूल्ये यांचा प्रभाव आहे. सर्जनशीलता आणि कुतूहलाच्या संस्कृतीसह तांत्रिक नवकल्पना भारताला जागतिक बाजारपेठेत आघाडीवर राहण्यास मदत करू शकतात.”
चोरडिया पुढे म्हणाले,”एकविसाव्या शतकात नेतृत्व करण्याची भारताची क्षमता तांत्रिक प्रगती, आर्थिक सामर्थ्य आणि आध्यात्मिक मूल्ये एकत्रित करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. तरुण लोकसंख्येचा उपयोग करून, नवनिर्मिती आणि नैतिक विकासाला चालना मिळाल्यास भारत विश्वगुरू बनण्याचे स्वप्न साकार करू शकतो. एकता, सहयोग आणि सामायिक मूल्यांद्वारे भारत जागतिक अर्थव्यवस्थेचे भविष्य घडविण्यास तयार होत आहे,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.