‘इंडस्ट्री सेंटर ऑफ एक्सलन्स’मधून विद्यार्थ्यांना
मिळणार तंत्र-कौशल्याधारित शिक्षणाची संधी
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन व एज्युस्किल्स फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (एसआयएमएमसी) व एज्युस्किल्स फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये ‘इंडस्ट्री सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरमुळे विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री ४.०’साठी उपयुक्त तांत्रिक व कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. जागतिक स्तरावरील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांकडून या अभ्यासक्रमांना सहकार्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना आवश्यक व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
यासंबंधित सूर्यदत्त व एज्युस्किल्स यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानंतर ‘एज्युस्किल्स-इंडस्ट्री सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना झाली आहे. यावेळी एज्युस्किल्स फाउंडेशनचे सहयोगी संचालक बिबेक रंजन, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. खुशाली ओझा आदी उपस्थित होते. तरुण पिढीमध्ये कौशल्यवर्धन व कौशल्यविकासाला प्रोत्साहन देऊन त्यांना करिअरची सुरुवात चांगली होण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. हे सेंटर गुगल फॉर डेव्हलपर्स, मायक्रोचीप, झेडस्केलर, पालो अल्टो, अल्टेअर, बेंटली एज्युकेशन, सेलोनीस, फोर्टीनेट अल्टेरिक्स एन्सिस, मिडास, वाधवानी आदी आंतरराष्ट्रीय आयटी दिग्गजांच्या सहकार्याने कार्यरत आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित ‘एसआयएमएमसी’मध्ये पूर्णवेळ एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए हे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. एज्युस्किल्स फाउंडेशन सोशल तंत्र-शिक्षणातील संस्था असून, देशातील २२ राज्यात कार्यरत आहे. तसेच इंटर्नशिप आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी ‘एआयसीटीई’सोबत भागीदार आहे. यासह जागतिक पातळीवरील १३ पेक्षा अधिक आयटी कंपन्यांशी भागीदार आहे. डिजिटल युगात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान देऊन सशक्त बनवण्याच्या उद्देशाने फाउंडेशन काम करत आहे. याचा व्यापक विस्तार आणि मजबूत भागीदारींनी भारतातील शिक्षण क्षेत्रावर मोठा प्रभाव पाडला आहे, उद्योगाच्या गरजा आणि शिकण्याच्या संधींमधील अंतर कमी केले आहे.
एज्युस्किल्सने ‘एआयसीटीई’ मान्यताप्राप्त काही निवडक संस्थांशी भागीदारी केली असून, त्याद्वारे आभासी इंटर्नशिप्स ऑफर केल्या जाणार आहेत. ‘एसआयएमएमसी’ त्यापैकी एक आहे. समग्र विकास, आंतरशाखीय शिक्षण, उद्योग-संस्था उपक्रम, एआयसीटीई-सीआयआय प्लॅटिनम रँकिंग आणि इतर प्रमुख बी-स्कूल रँकिंग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे (एनईपी) पालन यासारख्या निकषांच्या आधारे एज्युस्किल्सने ‘एसआयएमएमसी’शी भागीदारी केली आहे.
विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळविण्यात या केंद्राची मदत होईल. त्यांना उद्योगातील व्यावसायिकांशी नेटवर्किंग करण्याची आणि नवीनतम तंत्रज्ञानाबद्दल मौल्यवान माहिती मिळविण्याची संधी मिळेल. देशभरातील विविध कौशल्य भागीदारीतील कॉर्पोरेट्सद्वारे ऑफर केलेल्या आभासी इंटर्नशिप्स घेण्यास विद्यार्थ्यांना लाभ होईल. ‘एआयसीटीई’नेही नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांना उच्च शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, आभासी इंटर्नशिप्सद्वारे पुढील शिक्षण घेणे त्यांना लाभदायी ठरेल. सूर्यदत्त शैक्षणिक संस्था आणि उद्योगाच्या गरजांमधील अंतर कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक-अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन |