वीज यंत्रणेपासून अधिक सतर्क राहा, वीजसुरक्षेची खबरदारी घ्या

वीज यंत्रणेपासून अधिक सतर्क राहा, वीजसुरक्षेची खबरदारी घ्या

 

पुणे, दि. २२ –  सध्या शहरी व ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाची कोसळधार सुरू आहे. येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होत असल्याने पावसाळ्यात वीजसुरक्षेबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. पाणी हे विजेचे चांगले वाहक आहे. त्यामुळे प्रामुख्याने रस्त्यावरील सार्वजनिक वीजयंत्रणा, पथदिव्यांच्या लोखंडी खांबापासून आणि घरगुती वीज उपकरणांपासून विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन  (Appeal to take special precautions against iron poles of street lamps and household electrical appliances  )   महावितरणकडून करण्यात आले आहे.

अतिवृष्टी, वादळी पावसामुळे तुटलेल्या वीजतारा, पथदिवे, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. वीजखांब वाकतात व वीजतारा तुटतात. लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी. फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी अॅल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातुची तार वापरली पाहिजे. त्यामुळे काही बिघाड झाल्यास वीजपुरवठा तात्काळ खंडित होतो व संभाव्य धोका टळतो. घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅण्टेना वीज तारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावे. पथदिवे किंवा विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. त्यास दुचाकी टेकवून ठेवू नये किंवा जाणता अजाणता हात देखील लावू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सोसायटीमध्ये पथदिवे असल्यास सर्व पथदिव्यांचे अर्थिंगचे आणि वायरिंगचे जाईंट सुस्थितीत असल्याचे संबंधित सोसायट्यांनी नोंदणीकृत विद्युत कंत्राटदारांकडून तपासणी करून घ्यावी. पावसाळ्यामध्ये लोखंडी पत्र्याची घरांचा किंवा इमारतीमध्ये लोखंडी जिन्याचा वापर करीत असल्यास त्या ठिकाणच्या वीजयंत्रणेचे अर्थिंग व्यवस्थित असल्याची खात्री करावी. घराच्या बाहेरील भिंतीवर किंवा लोखंडी पत्र्याच्या घराला पावसामुळे ओल येते. तेथील वायरचे इन्सूलेशन खराब झाले असल्यास भिंतीमध्ये विद्युतप्रवाह येऊ शकतो. हे टाळण्यासाठी वायरच्या इन्सूलेशनची पाहणी व दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

बहुतेक इमारतींच्या तळमजल्यावर वीजमीटर बसविलेले आहेत. पावसाळ्यात अनेक इमारतींमध्ये पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे तळमजल्यामध्ये पाणी साचते. वीजमीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढते. अशी वेळी वीजपुरवठा बंद ठेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधितांनी महावितरणशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच महावितरणकडून पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागात संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे.

वीजविषयक किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारींसाठी महावितरणचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक वीजग्राहकांसाठी २४ तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाईटद्वारेही तक्रारी नोंदविण्याची सोय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *