प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; ‘एससीएचएमटीटी’च्या विद्यार्थ्यांची ‘इन व्हेन्यू हॉस्पिटॅलिटी सॅटेलाइट किचन’ला भेट
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित स्कूल ऑफ कलिनरी अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या (एससीएचएमटीटी) विद्यार्थ्यांना अलीकडेच प्रसिद्ध इन व्हेन्यू हॉस्पिटॅलिटी सॅटेलाइट किचनला भेट देण्याची संधी मिळाली. व्यावसायिक स्वयंपाकघर कसे चालते आणि मोठ्या स्वरूपातील कार्यक्रमांचे केटरिंग कसे असते, याची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना घेता आली.

विद्यार्थ्यांना लग्न, मोठ्या परिषदा आणि कॉर्पोरेट मेळाव्यांसारख्या कार्यक्रमांना भोजनाचा पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या हॉस्पिटॅलिटी सॅटेलाइट किचनच्या ऑपरेशन्सची व्यावहारिक ओळख व्हावी, हा या भेटीमागचा उद्देश होता. विद्यार्थ्यांनी या स्वयंपाकघराची पाहणी करून तेथील गुणवत्ता आणि कार्यक्षमता अनुभवली. मोठ्या प्रमाणात अन्न तयार करण्यातील जटिल कार्यप्रणालीचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांनी सॅटेलाइट स्वयंपाकघरातील विविध विभागांचा शोध घेतला. अन्न निर्मिती तयारी क्षेत्र, स्वयंपाक आणि साठवण केंद्राची पाहणी केली. अन्न निर्मिती प्रक्रिया पाहिली. येथे वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञान, कन्व्हेक्शन ओव्हन, औद्योगिक रेफ्रिजरेटर आणि ब्लास्ट चिलर अशा अत्याधुनिक उपकरणांविषयी विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. तसेच अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेला दिले जाणारे महत्व अनुभवले. कार्यक्रमाचे समन्वयन, त्यानुसार अन्नाचा पुरवठा व तेथील भोजनाचे व्यवस्थापन याविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. यासह प्रत्यक्ष पाककृतींची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी पाहिली. वेळेचे व्यवस्थापन, मल्टीटास्किंग आणि कार्यक्षम स्वयंपाकघरातील कामकाजाचे महत्त्व याविषयी मौल्यवान धडे विद्यार्थ्यांना मिळाले. यामुळे त्यांना हॉस्पिटॅलिटी उद्योगातील वास्तविकता आणि तेथील आव्हानांसाठी तयार होण्यास मदत होईल.”