बंधुत्वाच्या भावनेतून स्थापित होणारी समता जैविक

बंधुत्वाच्या भावनेतून स्थापित होणारी समता जैविक

प्रा. सुभाष वारे यांचे मत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार घोषित

पुणे: “समाजात आजही विषमता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. समतेचे वातावरण निर्माण व्हायचे असेल, तर समतेला बंधुतेचा ओलावा मिळाला पाहिजे. अंतःकरणातून प्रेमभावाने समानता आली, तर खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात उल्लेखित केलेल्या समतेचा व बंधुतेचा आदर होईल. अशी समता खऱ्या अर्थाने जैविक असते,” असे मत २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. सुभाष वारे यांनी व्यक्त केले. बंधुभावाच्या भावनेतून समाजातील विषमता दूर करण्यासह संविधानाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. वारे यांचा, तर विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. भारती जाधव यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या आवारातील संविधान कट्ट्यावर झालेल्या कार्यक्रमावेळी विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, काषाय प्रकाशनचे प्रा. चंद्रकांत वानखेडे, परिषदेचे सरचिटणीस प्रा. शंकर आथरे, एस. एम. जोशी फाऊंडेशनचे व्यवस्थापक राहुल भोसले, बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.

यावेळी संमेलनात देण्यात येणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार’ व ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली. डॉ. प्रभू गोरे (संपादक-आधुनिक केसरी, छत्रपती संभाजीनगर), सचिन कापसे (वृत्तसंपादक-लोकमत पुणे), मंगेश कोळपकर (मुख्य वार्ताहर-सकाळ, पुणे), नंदकुमार जाधव (मुख्य उपसंपादक-पुण्यनगरी, पुणे), महेश देशपांडे (वरिष्ठ वार्ताहर-केसरी, अहिल्यानगर), चैत्राली चांदोरकर (वरिष्ठ वार्ताहर-महाराष्ट्र टाइम्स, पुणे), नोझिया सय्यद (वरिष्ठ वार्ताहर-पुणे मिरर), अश्विनी जाधव (वरिष्ठ वार्ताहर-लोकमत ऑनलाईन, पुणे), सागर सुरवसे (वरिष्ठ वार्ताहर-टीव्ही नाईन, सोलापूर), गुलाबराजा फुलमाळी (संपादक-महाराष्ट्र दर्पण, नेवासा) व हेमंत थेटे (वार्ताहर-लोकसत्ता, नाशिक) यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कारासाठी प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण (पुणे), प्रा. डॉ. संदीप सांगळे (तळेगाव ढमढेरे), प्रा. डॉ. कामयानी सुर्वे (चिंचवड), प्रा. भारती जाधव (वाघोली), हनुमंत चांदुगडे (बारामती), प्रा. डॉ. जयश्री आफळे (सातारा), शरद शेजवळ (नाशिक), विजयकुमार मिठे (नाशिक), दिनकर बेडसे (धुळे), राजू मोहन (देहू), बाळासाहेब गोजगे (तळेगाव दाभाडे), भाऊसाहेब मोते (नाशिक) यांची निवड झाली आहे. डॉ. विजय ताम्हाणे यांनी स्वागत केले. प्रा. शंकर आथरे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत रोकडे यांनी आभार मानले.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या व चळवळीच्या प्रवासाविषयी मनोगत मांडले. समाजात आज बंधुतेच्या मूल्याची रुजवण होणे गरजेचे असून, संविधानाला सर्वोच्च मानून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी उभारली पाहिजे. बंधुत्वाचे नाते दृढ झाले, तर समाजातील विषमता दूर होण्यास मदत होईल, असे रोकडे यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर करून समाजातील समता, बंधुभाव आणि साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *