केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचे मत; एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
दी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आणि ७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राममोहन नायडू बोलत होते. पाषाण रस्त्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम ऑडिटोरियममध्ये ‘विकसित भारतासाठी एरोस्पेस क्षेत्रातील आव्हाने’ या संकल्पनेवर ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी संयुक्त अरब अमिराती येथील अबुधाबी स्कुल ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन डॉ. तय्यब कमाली, ‘इसरो’चे माजी चेअरमन डॉ. एस. सोमनाथ, ‘डीआरडीओ’चे माजी चेअरमन व सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, सचिव जेष्ठ शास्त्रज्ञ जेया संथी, महासंचालक प्रा. प्रतीक किशोर, ‘डीआरडीओ’ ‘एचईएमआरएल’चे संचालक डॉ. ए. पी. दास, ‘एआरडीई’चे संचालक अकांती राजू, सहयोगी संचालक एम. व्ही. रमेश कुमार आदी उपस्थित होते. यावेळी सोसायटीच्या स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. एस. सोमनाथ म्हणाले, “इसरोमध्ये काम करताना एरोनोटीकल सोसायटीकडे आम्ही आकर्षित झालो. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. देशभरातील एरोस्पेसमध्ये काम करणारे सर्व तज्ज्ञ एकत्रित आले आहेत. एरोस्पेस क्षेत्र हे बदलत्या काळात ‘आत्मनिर्भर भारत’ विकसित करण्यासाठी पूरक आहे. युवकांनी या क्षेत्रात आकर्षित होऊन काम करावे. कौशल्य आधारित मनुष्यबळ त्यासाठी निर्माण केले गेले पाहिजे. स्टार्टॲप, संशोधनावर भर दिला पाहिजे.”
डॉ. सतीश रेड्डी म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये एरोनोटीकल सोसायटीची स्थापना झाली. आज देशभरात २२ शाखा त्याच्या झाल्या असून एरोनोटीकल संदर्भात विविध काम करत आहे. ‘विकसित भारतमध्ये एरोस्पेस क्षेत्रातील आव्हाने’ याबाबत चर्चा या परिषदेत करण्यात येत आहे. विकसित भारत अंतर्गत प्रादेशिक ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. हे एअरक्राफ्ट देशाला इतर ठिकाणी निर्यात देखील करता येईल. एरोस्पेस मध्ये देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे.”
या परिषदेत हवाई क्षेत्राशी संबंधित नागरी हवाई उड्डाण, स्पेस व्हेइकल्स, सॅटेलाईट्स, एरो इंजिन्स, मिसाईल सिस्टिम्स, लढाऊ विमाने व एरोस्पेस, ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स अशा विविध विषयांवर चर्चासत्रात तज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले. स्टार्टअप आणि उद्योग यांच्यातील संवाद सत्राचे, विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे प्रदर्शन, तसेच विविध स्मृती व्याख्याने या परिषदेत आयोजित करण्यात आली आहेत.