पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भोकरे यांना ब्राह्मण, गोरक्षक व मराठा संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भोकरे यांची मतदारसंघातील ताकद आणखी वाढली आहे. हिंदुविरोधी लोकांच्या पायावर डोके ठेवणाऱ्या भाजप उमेदवार, ब्राम्हण-मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला घरी बसवण्यासाठी या संघटनानी दिलेला पाठिंबा माझ्यासाठी महत्वपूर्ण असल्याचे गणेश भोकरे यांनी यावेळी सांगितले.
हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, आर्यश्रेष्ठ ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्र ब्राह्मण संघाचे अध्यक्ष दिनकर उर्फ दिनेश कुलकर्णी, वेदमंत्र सामाजिक मंचाचे अध्यक्ष विनायक गोखले, गोपाल रक्षा दलाचे अध्यक्ष राहुल चितळे, पुणे मराठा महासंघाचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत गणेश भोकरे यांची भेट आपला पाठिंबा जाहीर केला.
कसबा मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्या मोठी आहे. गिरीश बापट, मुक्ता टिळक यांच्या रूपाने गेली अनेक वर्षे इथे ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व मिळायचे. मात्र, टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वांची मागणी असताना ब्राह्मण समाजाला डावलले गेले. त्याचा फटका भाजपाला बसला होता. लोकसभेलाही ब्राह्मण समाजाचा विचार झाला नाही. या निवडणुकीत ब्राह्मण समाजाचा विचार झालेला नाही. त्यामुळे आम्ही प्रचंड नाराज आहोत. हिंदुत्वाचा विचार सोडून बाकीचे सर्व राजकारणी स्वार्थात गुंतले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे ब्राह्मण समाज, हिंदुत्व मानणाऱ्या संघटना गणेश भोकरे यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत, असे या संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
गणेश भोकरे म्हणाले, “मला समाजाच्या सर्वच स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंदुत्ववादी, ब्राह्मण व मराठा समाजाच्या संघटनांनी दिलेला पाठिंबा माझी ताकद वाढवणारा आहे. इतर पक्ष स्वार्थी राजकारण करत असताना खरे हिंदुत्व राज ठाकरे जपत आहेत. त्यांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन माझी कसब्यात लढाई सुरु आहे. ब्राह्मण समाजाला योग्य तो न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवणार आहे.”